अभिनाश जमवालकडून शिवा थापा पराभूत
निखत झरीन, लवलिना, मीनाक्षी यांचे विजय
वृत्तसंस्था / ग्रेटर नोएडा
येथे सुरू असलेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरूषांच्या विभागात 23 वर्षीय अभिनाश जमवालने अनुभवी शिवा थापाचा पराभव केला. मात्र महिलांच्या विभागात निखत झरीन, लवलिना बोर्गोहेन आणि मीनाक्षी यांनी आपल्या वजन गटातून प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले. हिमाचल प्रदेशच्या 23 वर्षीय जमवालने आसामच्या शिवा थापाचा पराभव करुन अनपेक्षित धक्का दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या मुष्टीयुद्ध स्पर्धांमध्ये जमवालने विश्व मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेच्या तीन टप्प्यांमध्ये रौप्य पदके मिळविली आहेत. मात्र या लढतीमध्ये आतापर्यंत अनेकवेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळविणाऱ्या शिवा थापाला जमवालच्या जबरदस्त ठोशाने पराभूत केले. शिवा थापाचा हा जमवालकडून झालेला दुसरा पराभव आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या सत्रामध्ये महिलांच्या विभागातील 30 लढती आयोजित केल्या होत्या. महिलांच्या 48 किलो वजन गटात विद्यमान विश्वविजेती मीनाक्षीने तामिळनाडूच्या लक्ष्या विजयनचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव केला. तर आतापर्यंत दोनवेळा विश्व्ा विजेतेपद मिळविणारी निखत झरीनने चंदीगडच्या निधीचा 5-0 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. 75 किलो वजन गटात लवलिना बोर्गोहेनने तेलंगणाच्या कृषा वर्मावर 5-0 अशा गुण फरकाने मात केली. सेनादलाच्या प्रिती पवारने 54 किलो गटात, हितेश गुलीयाने 70 किलो गटात, पवन बर्थवालने 55 किलो गटात, अंकुश पांगालने 80 किलो गटात तर जुगनू अहलावतने 85 किलो वजन गटात विजय नोंदवित पुढील फेरी गाठली. मात्र अशीष कुमार चौधरीला 80 किलो वजन गटातील पहिल्याच फेरीत अपात्र ठरविण्यात आले.