शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवपुण्यतिथीचे आचरण
बेळगाव :
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आचरण्यात आली. सगळीकडे हनुमान जयंती साजरी होत असताना रायगडावर चैत्र पौर्णिमेदिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. महाराजांनी केलेल्या कार्याची जाणीव सकल हिंदू समाजाला राहावी म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यानात प्रेरणा मंत्राने सुरुवात झाली. महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, धारकरी मारुती पाटील आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी किरण गावडे यांनी शिवभक्तांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पुंडलिक चव्हाण, चंद्रकांत चौगुले, किरण बडवाण्णाचे, गजानन निलजकर, विजय कुंटे, अमोल केसरकर, युवराज पाटील, राजू बिर्जे यासह शिवभक्त उपस्थित होते.