शिवरात्रीच्या पूर्वसंध्येला शिवमहोत्सव
पर्यटन खात्यातर्फे होणार आयोजन : सुदेश भोसले यांचा खास कार्यक्रम
पणजी : गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यस्तरीय शिव महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. राज्यात पहिल्यांदाच होणारा हा महोत्सव सावर्डे मतदारसंघातील सत्पाल मैदानावर साकोर्डा मोले तांबडे सुर्ल रस्त्या नजीक शिवरात्रीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 25 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हा महोत्सव सुऊ होईल, असे गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन आणि सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी सांगतले. पर्यटकांना वेगळा गोवा दाखविण्याच्या उद्देशाने अशा महोत्सवांचे आयोजन केले जात आह। असेही गावकर म्हणाले. काल मंगळवारी घेतलेल्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत गणेश गावकर बोलत हेते.
यावेळी त्यांच्या सोबत व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, सरव्यवस्थापक गॅविन डायस, दीपक नार्वेकर व अन्य उपस्थित होते. गावकर पुढे म्हणाले की गोव्यात येणारे पर्यटक केवळ गोव्यातील समुद्रकिनारे पहाण्यासाठी गोव्यात येत असतात. केवळ समुद्रकिनारे म्हणजे गोव्यातील पर्यटनस्थळे असा समज झालेला आहे. मात्र गोव्यात पहाण्यासारखे किंवा अनुभवण्यासारखे खूप काहीतरी आहे, त्याचा पर्यटकांना परिचय करून देणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी पर्यटन खाते काम करीत असल्याचे गावकर यांनी सांगितले. त्या अनुशंगाने अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे फार महत्वाचे आहे. असेही गावकर म्हणाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन आणि सावर्डेचे आमदार गणेश गावकर, राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू आणि अन्य मान्यवर उपस्थित रहातील. या महोत्सवात स्थानिक कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. त्यात बाराभूमी संघातर्फे ढोल ताशांच्या गजरात ‘शिवगान’ सदर केले जाईल. त्यानंतर शिव स्तुती नृत्य नाटिका होईल. नामांकित भरतनाट्याम कलाकार पवित्रा भट आणि कलकारांचा शिवभक्त भरतनाट्या कार्यक्रम होईल.
नंतर गंगा आरती कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर रात्री नामवंत बॉलीवुड गायक सुदेश भोसले यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे खास आर्कषण म्हणून सोनाली कुलकर्णी आणि अवधुत गुप्ते कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. याशिवाय अखिल गोवा ऑनलाईन वेशभुषा स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार आहे. तामडी सुर्ला येथे मंदिराच्या परिसरात स्टॉल उभरण्यात येणार असून 26 रोजी शिवरात्रउत्सवा निमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटप केले जाईल.