शिवशाहीर डॉ. राजू राऊत यांचा मंत्री चंद्रकांतदादांकडून गौरव
घरी जाऊन केला सत्कार : लोककलेचा सन्मान
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा (2023) प्रतिष्ठेचा सांस्कृतिक पुरस्कार शिवशाहीर डॉ. पुरुषोत्तम ऊर्फ राजु राऊत यांना नुकताच जाहीर झाला आहे. त्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डॉ. राऊत यांचा त्यांच्या शिवाजी पेठेतील घरी जाऊन सत्कार केला.
स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणीसाहेब यांच्या प्रेरणेने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी विचार घेऊन गेली डॉ. राऊत तीन दशके शाहीरीच्या माध्यमातून कार्य करत आहेत. प्रबोधनाच्या सामाजिक चळवळीत कार्यरत असलेले डॉ. पारंपरिक लोककलेला पुनरूज्जीवीत करण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांचा सन्मान केला आहे. तीन लाख रूपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे. दरम्यान, कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डॉ. राऊत यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्याशी चर्चाही केली. यावेळी यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, प्रकाश सरनाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.