For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उबाठा शिवसेनेचा आचरा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

11:28 AM May 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
उबाठा शिवसेनेचा आचरा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव
Advertisement

आचरा प्रतिनिधी

Advertisement

मान्सून पूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आचरा दशक्रोशीत गेले तीन चार दिवस सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठयामुळे संतप्त बनलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या आचरा विभागाच्यावतीने आचरे येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घालीत प्रश्नांचा भडीमार करत जाब विचारला . वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास माजी आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आचरे ग्रामस्थ व व्यापारी यांना सोबत घेऊन मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी उबाठा शिवसेना आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांनी दिला आहे. दरम्यान, यावेळी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात वीज पुरवठा सुरुळीत करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.गेले तीन चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वीज वितरणची व्यवस्था कोलमडली असून पहिल्याच पावसात आचरा दशक्रोशीतच नव्हे तर तालुक्यातही वीज पुरवठा खंडित झाला आहे. सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे व्यावसायिक तसेच ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे आचरा वीज वितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात उबाठा शिवसेना आचरा विभागाच्या वतीने आज सकाळी शिवसेना आचरा विभागप्रमुख समीर लब्दे यांच्या नेतृत्वाखाली आचरे येथील वीज वितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आचरा तिठा येथून काढलेल्या या मोर्चा मध्ये उबाठा शिवसेना आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, आचरा शहरप्रमुख माणिक राणे, महिला विभागप्रमुख अनुष्का गांवकर, आचरा माजी सरपंच चंदन पांगे, चिंदर माजी सरपंच प्रकाश वराडकर, उपविभाग प्रमुख अनिल गावकर, उपविभाग प्रमुख सचिन रेडकर, पळसंब उपसरपंच अविराज परब, त्रिंबकचे ज्येष्ठ शिवसैनिक संतोष गोरवले, नितीन घाडी, संजय वायंगणकर, दाजी गोलतकर, अजय आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक बी. जी. धुमाळ, पोलीस अधिकारी देसाई, आचरेकर, वैजल उपस्थित होते.यावेळी उबाठा शिवसेना व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वीज महावितरण कंपनी चे सहाय्यक अभियंता श्री. मठकर यांना खंडित वीज पुरवठ्याबाबत जाब विचारला. विभाग सांभाळत असताना आवश्यक असणारी साधन सामुग्री आणि मनुष्य बळ आपणांकडे उपलब्ध आहे का ? असा प्रश्न अनुष्का गांवकर यांनी विचारला. तर वीज अधिकाऱ्यांनी केवळ शहरी भाग न बघता ग्रामीण भागावर सुध्दा विशेष लक्ष द्यावे असे समीर लब्दे यांनी ठणकावले. गेले तीन चार दिवस वीज खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप होत आहे, व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे, व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान वीज वितरण कंपनी भरुन देणार का असा प्रश्न माणिक राणे यांनी विचारला. वीज समस्या तसेच खंडित वीज पुरवठ्या बाबत वीज कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता कर्मचारी वर्ग प्रतिसाद देत नसल्याचे नीतीन घाडी यांनी सांगितले. तर तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करुन महावितरणास पाठीशी का घालता असा सवाल अविराज परब यांनी विचारत पावसाळ्यापुर्वी करण्यात येणारी वीज लाईन वरील झाडे कटाई झाली नसल्याचे पुराव्यासहित सांगत अधिकाऱ्यांना निरुत्तर केले. आज शांततेने आपणांस समज देण्यात आली आहे. परंतु चार दिवसांत हे सर्व सुरळीत न झाल्यास महाविकास आघाडी आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, चार दिवसात योग्य न्याय न मिळाल्यास माजी आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात बाधित ग्रामस्थ व व्यापारी यांना सोबत घेऊन मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी समीर लब्दे यांनी वीज अधिकाऱ्यांना दिला.

Advertisement
Advertisement
Tags :

.