महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवसेनेचा ‘कोहिनूर’

06:13 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिवसैनिक, नगरसेवक, महापौर, मुख्यमंत्र्यापासून ते केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्षापासून विविध पदांवर आपल्या सुसंस्कृतपणा अन् अभ्यासूपणाची छाप उमटविणाऱ्या मनोहर जोशी यांच्या निधनाने देश एका बहुआयामी नेत्याला व कोहिनूर हिऱ्यालाच मुकला आहे. उत्तम वक्तृत्व, हजरजबाबीपणा, मिश्कील वृत्ती, खेळकर वातावरण राखत प्रभावीपणे मुद्दे मांडण्याची हातोटी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य अन् विचारी व संयमी भूमिका, ही त्यांची वैशिष्ट्यो. त्यामुळेच शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षात राहूनही मनोहर जोशी यांचे वेगळेपण उठून दिसले. जोशी यांची चार, साडेचार दशकांची कारकिर्द थक्क करणारीच म्हणावी लागेल. रायगडमधील एका छोट्याशा गावातून मुंबईत आलेल्या या मुलाने माधुकरी मागत शिक्षण पूर्ण केले. ‘कोहिनूर टेक्निकल क्लासेस’चे सर्वेसर्वा वा प्रिन्सिपल या नात्याने केलेले वेगवेगळे प्रयोग, विद्यार्थ्यांसाठी अनेकविध अभ्यासक्रमांची केलेली आखणी यातून विद्यार्थीवर्गाच्या करिअरचा मार्ग त्यांनी प्रशस्त करून दिला. स्वाभाविकच युवा वर्ग त्यांच्याशी जोडला गेला. मराठी माणसाने जीवन शिक्षण घ्यावे व उद्योsजक म्हणून पुढे यावे, यासाठी ते प्रयत्नरत असत. याचदरम्यान म्हणजेच 19 जून 1966 रोजी मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. बाळासाहेबांच्या विचारांच्या प्रभावातून जोशी सरही 1967 पासून सेनेशी थेट जोडले गेले. बाळासाहेबांच्या अष्टप्रधानांपैकी एक म्हणून ते ओळखले जात. दादर हा सेनेचा किल्ला. दादरमधील अभिजन वर्गातील चेहरा म्हणून पुढे आलेले मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, लालबाग परळमधील दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, वामनराव महाडिक, लीलाधर डाके, माझगाव भागातील छगन भुजबळ, याच वर्गात वाढत गेलेले डॉ. हेमचंद्र गुप्ते, सतीश प्रधान, आनंद दिघे चेंबूर भागातील शरद आचार्य, नारायण राणे, अशा वेगवेगळ्या वयाच्या, पिढीच्या नेत्यांनी सेनेचे नाव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. त्यात सेनेची संघटनात्मक घडी बसविण्यात जोशी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पत्रव्यवहार, बैठका लावण्यापासून वेगवेगळी कामे त्यांनी केली. पक्षाची घटना, कार्यपद्धती, यासाठी झटणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये ते अग्रस्थानी असत. याशिवाय सेना गावोगावी पोहोचविण्यात, पक्षाला कार्यक्रम देण्यातही बाळासाहेबांचा हा शिलेदार हिरिरीने पुढे असे. 1968 मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय करिअरला सुऊवात करणाऱ्या या नेत्याने पहिल्याच टर्ममध्ये नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली. त्यांची महापौरपदाची कारकीर्दही संस्मरणीय ठरावी. महापौर हा रबरी स्टॅम्प असता कामा नये. तर त्यास विशेषाधिकार असावेत, अशी मागणी सर्वप्रथम कुणी केली असेल, तर सरांनीच. आजही लोकप्रतिनिधींना अशी मागणी करावी लागते. मुंबईतील चर्चेतला चेहरा आणि लोकसंपर्क असलेला नेता म्हणून अल्पावधितच पुढे आलेल्या सरांनी प्रत्येक प्रसंगात दाखविलेला संयम आणि प्रगल्भता वाखणण्याजोगीच. छगन भुजबळ यांनी सेनेला जय महाराष्ट्र करताना सगळे खापर त्यांच्यावरच फोडले. मात्र, याबाबत त्यांनी चकार शब्द काढल्याचे स्मरत नाही. सेनेतील फुटीनंतर विलासरावांनी गोपीनाथ मुंडे यांना विरोधी पक्षनेतेपद दिले, तेव्हाही त्यांच्या याच गुणांचा प्रत्यय आला. 1990 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘होय आम्ही सत्ताधारी बनू,’ असा निर्धार व्यक्त करीत जोशी यांनी सकारात्मकता पेरण्याचे काम केले. 90 ला ही संधी हुकली असली, तरी 1995 ला महाराष्ट्रात युतीचे सरकार आले. वास्तविक त्या वेळी काही आमदार कमी पडत होते. मात्र, काँग्रेसपासून दुरावलेल्या अपक्षांना सोबत घेत सरकार टिकविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. खरे तर या काळात सरकारच्या तिजोरीत पैसा नव्हता. ओव्हरड्राफ्ट घ्यावे लागायचे. परंतु, जोशी, मुंडे जोडगोळीने महसूलाबाबत काटकसरीचे धोरण अवलंबत परिस्थिती गडगडणार नाही, याची काळजी घेतली. पाच वर्षांत पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणे असो, गडकरींच्या माध्यमातून सुरू केलेला रस्ते विकासाचा कार्यक्रम असो वा खडसे-शिवणकरांद्वारे सिंचन योजनांना गती देणे असो. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा यात महत्त्वाचा रोल होता. कृष्णा खोरे महामंडळाच्या प्रकल्पांकरिता रोखे विकावेत, ही अभिनव कल्पना त्यांचीच. सरकारकडे पैसे नसताना शेकडो कोटी ऊपयांचे प्रकल्प सुरू झाले, ते त्यांच्या या दूरदृष्टीतूनच. पुण्यातील जमीन प्रकरणात त्यांच्या जावयाचे नाव आल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांच्याकडे राजीनामा मागितला, तेव्हाही क्षणाचा विलंब न लावता त्यांनी लागलीच राजीनामा देऊन टाकला. संसदेवर हल्ला झाला, त्या वेळी तर मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. या घटनेला सामोरे जातानाच सत्ताधारी व विरोधकांमध्ये समन्वय साधण्याचे काम त्यांनी केले. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळीही मनोहर जोशीही फुटणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. तथापि, उद्धव ठाकरे यांच्या सेनेशीच अखेरच्या श्वासापर्यंत ते एकनिष्ठ राहिले. सतत पक्षबदलण्याच्या आजच्या राजकीय ट्रेंडमध्ये जोशी यांची ही निष्ठा दिशादर्शक ठरावी. ‘गणपती दूध प्याला’ या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील विधानावरून आजही जोशी यांची हेटाळणी केली जाते. मात्र, बाळासाहेबांबरोबर तुऊंगात गेलेल्यांमध्ये ते आणि दत्ताजी साळवी असे दोघे होते. बाळासाहेबांशी व सेनेशी त्यांची अॅटॅचमेंट होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच बाळासाहेबांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी प्रथम त्यांच्याकडेच सोपविली. पवारांसारख्या विरोधकांसोबत बुद्धीने लढले पाहिजे, याची जाणीव जोशी, नवलकरांसारख्या नेत्यांना होती. त्यामुळे विरोधकांशीही त्यांचा एक रॅपो होता. तर भाजपासारख्या मित्रपक्षाला ताणतणावात कसे हाताळायचे, याचे चातुर्यही त्यांच्या ठायी होते. आजच्या कर्कशीय राजकारणात जोशी सरांसारखा समन्वयवादी, अजातशत्रू नेता म्हणूनच खूप बहुमोल वाटतो.

Advertisement

Advertisement
Advertisement
Next Article