For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवसेना ठाकरे गटासमोर टिकून राहण्याचे आव्हान

06:23 AM Jan 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
शिवसेना ठाकरे गटासमोर टिकून राहण्याचे आव्हान
Advertisement

शिवसेना उध्दव ठाकरे गटाला लागलेली घरघर काही संपत नाही, त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही लागण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आपला पारंपारिक मतदार गमावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील राजन साळवी हे पक्षाला केव्हाही जय महाराष्ट्र करू शकतात, काल उबाठा गटातून धुळे, नवी मुंबई, पालघर, नाशिक, मुरबाड येथील विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राजन साळवीच्या नाराजीने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. भविष्यात पक्षासमोर बलाढ्या अशा भाजपसमोर टिकून राहण्याचे आव्हान असणार आहे.

Advertisement

शिवसेना आणि मराठी माणूस असे समीकरण कधी काळी मुंबईत होते, 2019 च्या निवडणुकीनंतर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना सर्वधर्मसमभाव होऊ लागली. कालांतराने शिवसेनेत फुट पडली आणि मतदारांसमोर दोन शिवसेनेचा पर्याय उभा राहिला. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेल्या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे बघायला मिळाले. यापूर्वी शिवसेनेने अनेक अपयश पाहिले, अपयशाला संधी मानत उध्दव ठाकरेंनी शिवसेनेचा आलेख नेहमीच चढता ठेवला, मात्र त्यावेळी शिवसेनेची विचारधारा ही बदललेली नव्हती. शिवसेनेकडे बिनीचे शिलेदार होते. भाजपसोबत असताना शिवसेनेला लोकसभेला मतदारांनी नाकारले तर विधानसभेला स्विकारले होते, विधानसभेला नाकारले तर महापालिका निवडणुकांना स्विकारले होते. कारण शिवसेनेचा पारंपारिक मतदार हा शिवसेनेच्या पाठिशी कायम होता, मात्र आता हा मतदार विभागला गेल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली दिशा, व्हिजन ठरवून टिकून राहण्याचे मोठे आव्हान उध्दव ठाकरेंपुढे असणार आहे. आज विधानसभेत शिवसेनेचे 20 आमदार निवडून आले, सुरूवातीच्या काळात शिवसेनेची विधानसभेत नगण्य संख्या असताना छगन भुजबळ यांनी विधानसभेत सर्वसामान्यांसाठी जो आवाज बुलंद केला, त्यामुळे शिवसेनेचे नाव घराघरात पोहचले. आज शिवसेनेकडे त्यांच्या भाषेत वीस वाघ आहेत, त्यातील भास्कर जाधव, सुनिल प्रभु, आदित्य ठाकरे यांचा अपवाद वगळता बाकी नवीन आमदार असून कोणीही विरोधकांना जाब विचारू शकेल असे वाटत नाही. शिवसेना (ठाकरे गट) पक्ष सध्या गोंधळलेला दिसत आहे, कधी काळी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी प्रादेशिक पक्ष म्हणून लढताना शिवसेना या दोघांना पुरून उरली होती. मात्र आज शिवसेनेला त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या भाजपशी लढणे अवघड जाणार आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेला पुन्हा बाळसे धरायचे असेल तर आता भाजपला टोकाचा विरोध न करता भाजपशी जमवून घेण्याशिवाय शिवसेनेला पर्याय नाही. अन्यथा जे आहे ते पण टिकवणे अवघड होऊन बसेल, याच दिशेने शिवसेनेला आता दिशा बदलावी लागणार असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी एक तर तू राहशील अन्यथा मी अशी टोकाची भाषा उध्दव ठाकरे यांनी केली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चित्र बदलले, विरोधीपक्षाचा नेता सुध्दा करू शकणार नाही इतके तोकडे यश तिन्ही पक्षांना मिळाले. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्हा दौऱ्यानंतर स्तुतीसुमने उधळण्यास सुरूवात केली आहे. सुषमा अंधारे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह संजय राऊत यांनी जाहीरपणे फडणवीस यांचे कौतुक केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील शपथविधीला निमंत्रण असताना न गेलेले उध्दव ठाकरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. भाजपकडे आता इतके संख्याबळ आहे की सोबत असलेला एखादा मित्रपक्ष गमावला तरी भाजपला काही फरक पडत नाही. कधी काळी राज्याच्या राजकारणात लहान भाऊ असलेला भाजप आता थेट बापाच्या भूमिकेत आहे. भाजपने नेहमीच आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी विरोधकांच्या विरोधकांना जिवंत ठेवले, त्यांना बळ दिले मग ते उध्दव ठाकरेंच्या विरोधासाठी राणा-राणे आणि राणावत असो, एकनाथ शिंदे यांनी नाराजी दूर सारत आता पक्ष विस्तारासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून, मुंबई, ठाणे महापालिका निवडणूक ही शिंदेंसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना आपली ताकद दाखविण्याची संधी शिंदे सोडणार नाहीत. कारण राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. शिवसेना ठाकरे गटाने नेमके हेच ओळखून आता भाजपसोबत मधुर संबंध बनविण्यासाठी सुरूवात केली आहे. शिवसेनेची पहिली सत्ता ठाण्यात आणि मग मुंबई महापालिकेत आली. ठाण्यात शिंदेंचे वर्चस्व आहे तर मुंबईत भाजपचा भगवा फडकवून पहिला महापौर होऊ शकतो. हेच सगळं बघता उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता दिशा बदलण्याची गरज आहे. संघटनेत फेरबदल करण्याची आवश्यकता आहे. संजय राऊत यांना धक्काबुक्की झाल्याची तर विनायक राऊत यांनी आपल्याला पाडल्याचे राजन साळवी यांनी उध्दव ठाकरे यांना सांगितले.

शिवसेनेत तेच ते नेहमीचे नेते निर्णय प्रक्रियेत आहेत. अशा लोकांबाबत पक्षाला विचार करावा लागेल, नवीन फळी निर्माण करावी लागेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची जशी बांधणी केली होती, बाळासाहेबांचे अष्टप्रधान मंडळ आज ही लोकांच्या ओठावर आहे. जेव्हा जेव्हा पक्षाला पराभवाचे संकट आले तेव्हा तेव्हा बाळासाहेबांचे शिलेदार ताकदीने मैदानात उतरल्याचा इतिहास आहे. बाळासाहेबांच्या या शिलेदारांनी बाळासाहेबांची शेवटपर्यंत साथ दिली,मग ते मनोहर जोशी, सुधीर जोशी असो लिलाधर डाके, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, मधुकर सरपोतदार, प्रमोद नवलकर, सतीश प्रधान असो. उध्दव ठाकरेंच्या काळातील सर्व नेते रामदास कदम, आनंदराव अडसुळ, गजानन किर्तीकर हे एकनाथ शिंदेंसोबत गेले. मात्र या नेत्यांनी देखील ठाकरे यांची साथ दिली, हे नेते हिंदुत्वाचे कारण सांगत असले तरी राजकीय अपरिहार्यतेमुळे त्यांना ठाकरे यांची साथ सोडावी लागली. आदित्य ठाकरेंची वरळीची एक जागा सेफ करण्यासाठी सुनिल शिंदे आणि सचिन अहीर यांना विधानपरिषद देणे, भाजपमधून आलेल्या डॉ. मनिषा कायंदे यांना विधानपरिषदेवर संधी देणे, काँग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेवर संधी देणे आणि विधानसभा, लोकसभा सर्वसामान्य शिवसैनिकांनी लढवणे, हा सगळा पॅटर्न आता शिवसेनेला बदलावा लागणार आहे. सध्याचे शिवसेनेचे आमदारांचे आणि खासदारांचे संख्याबळ बघता विधानपरिषद आणि राज्यसभेतसुध्दा कोणाला संधी मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे पक्षाला आता नव्याने फेररचना करावी लागेल. पुन्हा स्थानिक मुद्यावर लढा उभारावा लागेल, मुंबईसारख्या शहरात अनेक मतदार संघांमध्ये गुजराती, उत्तर भारतीय, दाक्षिणात्य मतदारांची संख्या नगरसेवक ठरवतात. त्यामुळे या सगळ्याचा विचार कऊन यातून आपली वाट काढण्याचे आव्हान शिवसेनेपुढे असणार आहे तर दुसरीकडे शिवसेनेचा हक्काचा मराठी पारंपारिक मतदार जो उध्दव ठाकरेंच्या सर्वधर्मसमभाव भूमिकेमुळे नाराज झाला आहे, तो बऱ्यापैकी एकनाथ शिंदे यांच्याकडे सरकला आहे. तो मतदार पुन्हा आपल्याकडे वळवण्याचे आव्हान उध्दव ठाकरेंसमोर असणार आहे.

Advertisement

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.