शिवसेनेची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक
रत्नागिरी :
शासकीय कार्यालय किंवा न्यायालयासमोर दाखल करणाऱ्या व इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आणि शपथपत्रावर आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क (बॉण्ड पेपर) शासन आदेशाने माफ केले आहे. पण या निर्णयाची अंमलबजावणी रत्नागिरीत होत नसल्याच्या विरोधात रत्नागिरी तालुका शिवसेनेचे पदाधिकारी (शिंदे गट) मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान शासकीय कामासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र, संमतीपत्र, हमीपत्र किंवा शासनाच्या विविध कामासाठी बॉंण्ड पेपरवर करण्यात येणारे सर्व प्रतिज्ञापत्र हे साध्या कागदावर करण्याचे आदेश जारी करण्यात आले. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे अनेक सर्वसमान्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने 30 ऑक्टोबर 2024 ला निर्णय जारी केला आहे. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी स्थानिक सेतू कार्यालयात होत नव्हती, अशा अनेक तक्रारी शिवसेनेकडे आल्या होत्या. शिवसेना शिंदे गटाच्या हे निदर्शनास आल्यानंतर मंगळवारी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शिवसेना नेते सुदेश मयेकर यांच्या मार्गदर्शना खाली निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची भेट घेतली. शासननिर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी केली.
जिह्यातील प्रत्येक सेतू कार्यालयामध्ये तशा प्रकारे बोर्ड लावून जनतेला माहिती देण्यात यावी. त्याबाबतची जनजागृती करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आल्या. या संदर्भात आपण तत्काळ कार्यवाहीचे आदेश देऊ तसेच ज्या ज्या सूचना केल्या आहेत. त्यावर लेखी आदेश संबंधितांना देऊ, असे अपर जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले.
या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आबा घोसाळे, विभागप्रमुख शंकर झोरे, उपविभागप्रमुख बाबा हळदणकर, उपतालुकाप्रमुख राजू साळवी, विभागप्रमुख स्वप्नील मयेकर, उपविभागप्रमुख भिकाजी गावडे, मिरजोळे विभाग संघटक, मजगांव सरपंच फैयाज मुकादम, पावस विभागप्रमुख विजय चव्हाण, गोळप विभागप्रमुख नंदा मुरकर, विशेष कार्यकारी अधिकारी सिद्धेश शिवलकर, माजी सरपंच जितेंद्र शिरसेकर, विभागप्रमुख प्रवीण पवार, विभागप्रमुख प्रवीण पांचाळ, निवेंडी सरपंच रवीना कदम आदी उपस्थित होते.