कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवसेना शिंदे गटाचे बालेकिल्ल्यात 'कमबॅक'

01:40 PM Jan 21, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / धीरज बरगे : 

Advertisement

विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीत बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेने 2024 च्या निवडणुकीत कमबॅक केले आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार, एक खासदार आहे. आता कॅबिनेट, पालकमंत्री पदाची साथ मिळाल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे. जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याची संधी शिवसेनेला मिळाली आहे. गेल्या पाच वर्षात मरगळलेल्या शिवसैनिकांना पाठबळ देत शिवसेनेला उर्जितावस्था देण्याची जबाबदारी मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पार पाडली. त्यामुळे आता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह खासदार, आमदार यांची जबाबदारी वाढली असुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना रिझल्ट दाखवावा लागणार आहे.

Advertisement

कोल्हापूर शहर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यानंतर हळूहळू जिल्ह्यात शिवसेना वाढत गेली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरने शिवसेनेला प्रथमच सहा आमदार दिले. त्यामुळे कोल्हापूरच्या शिवसेनेला राज्याच्या मंत्री मंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र भाजप-शिवसेनेमधील अंतर्गत असलेल्या सुप्त संघर्षामुळे जिल्ह्यातील एकही आमदार मंत्री होवू शकला नाही. याचा फटका 2019च्या विधानसभा निवडणुकीत बसला. यानिवडणुकीत शिवसेनेचे सहा पैकी पाच आमदार पराभूत झाले. एकमेव प्रकाश आबिटकर निवडून आले. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना पुन्हा बॅकफूटवर गेली. यानंतर 2022 मध्ये शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत गेलेले जिल्ह्यातील तत्कालीन खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांना निधीच्या माध्यमातून पाठबळ दिले.

यानंतर 2024 मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा दोन्ही निवडणुकीत काही मतदार संघात उमेदवार बदलण्याबाबत महायुतीमधुन दबाव टाकण्यात आला. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या शिवसैनिकांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ठाण मांडत आवश्यक त्या जोडण्या लावल्या. विधानसभा निवडणुकीतही लक्ष घालत पाठबळ दिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दोन पैकी एका जागेवर आणि विधानसभा निवडणुकीत चार पैकी चार जागांवर विजय मिळविला. मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या पाठबळामुळे जिल्ह्यात शिवसेना पुन्हा वाढली आहे. आता निवडूण आलेले आमदार, खासदार यांची जबाबदारी वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक हि त्यांच्यासाठी परीक्षाच असणार आहे.

जिल्ह्यातील शिवसैनिकांना गेली दहा वर्ष लाल दिवा हुलकावणी देत आला आहे. मात्र आता मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या रुपाने शिवसैनिकांची लाल दिव्याची स्वप्नपूर्ती झाली आहे. आता महापालिकेसह जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आव्हान पालकमंत्री आबिटकर यांच्यासह शिवसेना नेत्यांसमोर असणार आहे.

कोल्हापूर शहर शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी आत्तापर्यंत शिवसेनेला एकदाही महापालिकेत सत्ता मिळालेली नाही. बहुतांश निवडणुकीत नगरसेवकांची दोन अंकी संख्याही शिवसेनेला पार करता आलेली नाही. मागील सभागृहात शिवसेनेचे केवळ चार नगरसेवक होते. यापैकी एकच नगरसेवक आत्ता शिवसेना शिंदे गटासोबत आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली असली तरी महापालिकेवर शिवसेनेचे भगवा फडकविण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. मंत्री प्रकाश आबिटकर यांना पालकमंत्री पद मिळाले असले तरी शहरातील राजकारणावर त्यांचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी विशेषत: राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा कस लागणार आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार आहेत. तर सहयोगी, अपक्ष असे भाजपचे एकूण पाच आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेपेक्षा जिल्हयात भाजपचा एक आमदार जास्त आहे. मात्र भाजपसोबत असलेल्या आमदारांना मंत्रीमंडळात संधी मिळाले नाही. तर प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून शिवसेनेला मंत्रीपद मिळाल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे. शिवसेनेच्या वाढलेल्या ताकदीवर अंकुश ठेवण्यासाठी भाजपने कोल्हापूरला सहपालकमंत्री देण्याची रणनिती आखली असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article