तर महसूलमंत्र्यांचा जाहीर सत्कार करू
शिवसेना नेते संदेश पारकर यांचे आव्हान
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी - विक्री व्यवहार झाले आहेत. त्या सर्वांची श्वेतपत्रिका शासनाने काढावी आणि त्यात जर स्थानिक शेतकऱ्यांची नावे गायब झाली असतील तर संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषदेत केली . महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाळू माफिया, मायनिंग माफिया तसेच अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. जर त्यांनी ही कारवाई करून दाखवल्यास निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू असेही ते म्हणाले. श्री पारकर यांनी सावंतवाडी येथील हॉटेल शिल्पग्राममध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते . महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते . यावेळी त्यांनी अनेक बाबी उघड केल्या आहेत. आपण 22 जानेवारी 2025 रोजी त्यांना भेटून मुंबईत एक निवेदन दिले होते. त्या निवेदन तक्रारीनुसार त्यांनी आज अनेक मुद्दे जिल्ह्यात स्पष्ट केले. त्यांनी अवैध धंदे कारवाई करून बंद करून दाखवले तर आपण त्यांचा जिल्ह्याच्या वतीने सत्कार करू.अवैध वाळू मायनिंगवाल्यांना खतपाणी कोण घालत आहे व या अवैध मायनिंगवाल्यांचा आका कोण आहे असा सवाल संदेश पारकर यांनी विचारला आहे . जे अवैध मायनिंग सुरू आहे त्यातून मोठ्या प्रमाणात रॉयल्टी बुडवण्यात आली आहे . त्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे . जर यावर कोणतीच कार्यवाही न केल्यास आम्ही जनआंदोलन छेडू असेही त्यांनी स्पष्ट केले.