कोल्हापूर पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही
कोल्हापूर :
जिल्ह्यात ज्याचे आमदार जास्त त्याला पालकमंत्री पद असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेला मिळावे यासाठी आग्रही राहणार असल्याचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. तसेच विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा चालला त्यामुळे महायुतीला यश मिळाले. शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी भुमिका घेतल्याने सत्तास्थापनेचा मार्ग सुखर झाला आहे. महायुतीच्या सत्तास्थापनेत शिवसेनेला दूसऱ्या क्रमांची मंत्रीपदे मिळतील असा विश्वास क्षीरसागर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
क्षीरसागर म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील हिंदू देखिल एकवटले. हिंदू एकवटल्यावर काय करु शकतो हे विधानसभा निवडणुकीच्या निकालातुन हिंदूनी दाखवून दिले आहे. हिंदू एकवटल्यामुळे जिल्ह्यातील दहाही जागांवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास होता. कोल्हापूरच्या जनतेने मतदानातुन हा विश्वास सार्थ ठरवला असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तुडवले
शिवसेना प्रमुखांचे हिंदूत्त्व आणि काँग्रेससोबत कधीही न जाण्याचा विचार उद्धव ठाकरे यांनी पायदळी तुडवला. म्हणूनच आम्ही बाजूला जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना प्रमुखांनी कधीच पद घरात ठेवले नाही. मात्र पुत्र हट्टापोटी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद स्वत:कडे घेतले. वास्तविक त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करुन स्वत: रिमोट कंट्रोल म्हणून वापर करायला हवा होता. यामुळे नक्कीच शिवसेना वाढस मदत झाली असती, असे क्षीरसागर यांनी सांगितेल.
पराभवानंतरच इव्हीएमवर आरोप
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले त्यावेळी इव्हीएमवर कोण बोलले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत मोठ्याप्रमाणात पराभवाला सामोरे जावे लागल्याने महाविकासकडून बेछूट आरोप केले जात आहेत. नामुष्कीजनक पराभवामुळेच महाविकासकडुन इव्हीएमवर आरोप केले जात असल्याची टिका क्षीरसागर यांनी केली.
केडरमधील कार्यकर्ता, मंत्रीपद मिळेल
शिवसेनेच्या स्थापनेपासुनचा मी शिवसैनिक आहे. आत्ताची माझी आमदारकीची तिसरी टर्म आहे. गेली पाच वर्ष नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष या पदाचा कार्यभार सक्षमपणे सांभाळला. मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून शाश्वत परिषदेसारख्या संकल्पनांद्वारे जिल्ह्यात विकासाची नवी वाटचाल सुरु केली. मी केडरमधील शिवसैनिक असल्याने पालकमंत्री पद मिळेल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.