शिवसेनेकडून पंचायत समिती सदस्यांचा स्वतंत्र गट स्थापन
शरद धाऊसकर गटनेतेपदी निवड : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना पत्र केले सादर
न्हावेली /वार्ताहर
सावंतवाडी शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या समक्ष आपला अधिकृत गट स्थापन केला आहे.या नवनिर्वाचित गटाच्या गटनेतेपदी न्हावेली पंचायत समिती सदस्य शरद जयदेव धाऊसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या प्रकियेमुळे तालुक्यातील शिवसेनेच्या राजकीय हालचालींना आता अधिकृत कायदेशीर बळ मिळाले आहे.या महत्वपूर्ण प्रसंगी शिवसेनेचे सर्व प्रमुख पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.यामध्ये सुष्मिता जाधव,मायकल डिसोजा,उत्कर्षा गावकर,प्रणाली टिळवे,आणि प्रियांका देसाई या सदस्यांचा समावेश होता या सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन गट स्थापनेचा निर्णय जाहीर केला.शरद धाऊसकर यांच्या निवडीमुळे पंचायत समितीमधील पक्षाची धुरा आता एका अनुभवी हातात सोपविण्यात आली असून यामुळे आगामी काळातील विकासकामांना गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.