योगेश कदमांच्या पाठीशी शिवसेना खंबीर
खेड :
जनतेच्या सुखदु:खाशी समरस होऊन काम करणाऱ्या खऱ्याखुऱ्या व्यक्तीवरच आरोपांची राळ उठवली जाते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा काडीमात्र संबंध नसताना देखील विरोधकांकडून बिनबुडाचे बेछूट आरोप करून बदनाचीचे षडयंत्र रचले जात आहेत. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी विचलित न होता अजिबात चिंता करू नये. शिवसेना भक्कमपणे पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही, उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दिली. दापोलीतील नाट्यागृहासाठीही 15 कोटींच्या निधीची घोषणाही त्यांनी केली.
शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सततच्या पाठपुराव्याने तब्बल 13 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या वातानुकूलित स्व. मीनाताई ठाकरे नाट्यागृहाचा शुभारंभ शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थाटात झाला. तब्बल 19 वर्षानंतर नाट्यागृह रसिकांच्या सेवेत दाखल झाल्याने शुभारंभादरम्यान नाट्यारसिकांसह नागरिकांचीगर्दी उसळली होती. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, कोणतेही विकासकाम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा आवश्यक असतो. हाच पाठपुरावा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सातत्याने केल्यामुळेच मुंबई, पुणेसारख्या शहराच्या ठिकाणी असणारी नाट्यागृहाची वास्तू येथे उभी राहिली आहे. एकप्रकारे गृहराज्यमंत्री कदम यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिनी जनतेला दिलेली एक अनमोल ‘गिफ्ट’च आहे. या नाट्यागृहाद्वारे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक चळवळीला उभारी मिळून रसिकांची नाटकांची भूकही तब्बल 19 वर्षानंतर भागणार आहे.
कोकणच्या विकासासाठी निधी देताना आजवर कदापिही हात आखडता घेतलेला नाही आणि घेणारही नाही, असे अभिवचन देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यकर्तृत्वाचे तितकेच कौतुक केले. कोणी कितीही खोटेनाटे आरोप करून बदनामी केली तरी त्याकडे लक्ष न देता आपले काम प्रामाणिकपणे करत रहा, असा सल्ला देत आरोपीच्या पिंजऱ्यात कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला शिवसेनाच नव्हे तर तमाम जनता भक्कमपणे पाठीशी उभी राहिल, असा पुनरूच्चारही केला.
आपण कोणाच्याही वाट्याला जात नाही अन् गेलो तर कोणालाही सोडत नाही, असा टोला लगावताना विरोधकांनी कितीही बोंबा मारल्या तरी त्यांना प्रत्यक्ष कृतीतूनच चोख उत्तर देत असतो, असेही ठणकावले. पुढील गणेशोत्सवापूर्वी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला महामार्ग पूर्णपणे सुस्थितीत आलेला असेल, असे अभिवचनही शेवटी दिले.
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार अनिल परब यांच्यावर टिकेची झोड उठवली. केवळ स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासह पाठ थोपटून घेण्यासाठीच योगेश कदम यांच्यावर बेछूट आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या आरोपांना अजिबात भीक घालत नाही, अशी तंबी देत आरोपांच्या मूळाशी जाऊन विरोधकांना त्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचे ठणकावले. काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्यांना जनतेनेच धडा शिकवला असून शिंदे सेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा संशयही व्यक्त केला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही मनोगतात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यतत्परचे कौतुक करत नाट्यागृहाच्या सौरऊर्जेसाठी 80 लाख रूपयांच्या निधीची घोषणा करताना क्रीडांगणासाठी 2 कोटी रूपयांचा निधी जाहीर केला. रोजगार हमी योजना व फलोद्यानमंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही मनोगते व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तमाम जनतेच्या साक्षीने शिवसेना नेते रामदास कदम यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जंगी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उपनेते संजय कदम, श्रेया कदम, आमदार अशोक पाटील, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, मुख्याधिकारी महादेव रोडगे, माजी जि.प.सदस्य अरूण कदम, उद्योजक शैलेश कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
- कामाचा ‘फोकस‘ विकास आहे, त्यावरच भर द्या!
गृहराज्यमंत्री योगेश कदम हे शिवसेनेचे रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सचोटीने काम करत आहेत. त्यांच्यावर नाहक टीका करून प्रामाणिक काम बंद करता येणार नाही. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे चुकीचेच आहे. दरोडेखोरच चोर म्हणणार असतील तर कसे होणार, असा खडा सवाल उपस्थित केला. आपल्या कामाचा ‘फोकस‘ हा विकास आहे. त्यावरच भर द्या, असा मूलमंत्र देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे विसरले नाहीत.