Sangli Municipal Election : शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये सत्ता विभागली; स्थानिक नेतृत्व ठरले निर्णायक
सांगली जिल्ह्यात सत्तेचे नवे समीकरण
सांगली : नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक २०२५ चे निकाल जाहीर झाले असून सांगली जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. काही ठिकाणी सत्ताधारी पक्षांनी आपले वर्चस्व टिकवले आहे, तर काही नगरपरिषदांमध्ये सत्ताबदल झाला आहे. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सत्तेची विभागणी झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाने सत्ता कायम राखली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सहकार्याने शिवसेना शिंदे गटाने बहुमत मिळवत पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक यांची नगराध्यक्षपदी निवड केली आहे.
विटा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाने जोरदार कामगिरी केली असून १२ जागा जिंकत भाजपच्या ४ जागांसह सत्तास्थापना केली आहे. या ठिकाणी काजल संजय म्हेत्रे या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. विट्यात शिवसेनेचा झेंडा पुन्हा एकदा फडकताना दिसून आला आहे.
इस्लामपूर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने सत्ता मिळवली आहे. या ठिकाणी आनंदराव मलुंगे यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर तासगाव नगरपरिषदेत माजी खासदार संजय काका पाटील गटाने बहुमत मिळवत विजय बाबासाहेब पाटील यांची नगराध्यक्षपदी निवड केली आहे.
आष्टा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने स्पष्ट बहुमत मिळवत विशाल विलासराव शिंदे यांना नगराध्यक्ष बनवले आहे. तर आटपाडी नगरपंचायतीत भाजपने आघाडी घेत यु. टी. जाधव यांची नगराध्यक्षपदी निवड केली आहे.
पलूस नगरपरिषदेत काँग्रेसने सत्ता मिळवत सौ. संजीवनी सुहास पुदाले यांची नगराध्यक्ष म्हणून निवड केली आहे. जत नगरपरिषदेत भाजपने बहुमत मिळवत डॉ. रविंद्र आरी यांची नगराध्यक्षपदी निवड केली आहे.
एकूणच सांगली जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत पक्षीय राजकारणासोबतच स्थानिक नेतृत्व आणि गट-तटांचे राजकारण निर्णायक ठरले आहे. आगामी काळात नगरविकासाच्या दृष्टीने नव्या सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत