शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन
सावंतवाडी । प्रतिनिधी
येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेच्या पॅनल मधून निवडून आलेल्या सातही नगरसेवकांनी सिंधुदुर्गनगरी- ओरोस येथे नगर विकास अधिकारी विनायक औतकर यांच्याकडे नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र गट स्थापन केला. भाजपाने या आधीच नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गट स्थापन केला आहे. एकूणच दोन्ही पक्षाकडून गट स्थापन केल्यानंतर आता उपनगराध्यक्ष आणि विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीबाबत हालचाली पाहायला मिळणार आहेत.सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध शिंदे शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली होती. या लढतीमध्ये नगराध्यक्षपदी भाजपाच्या श्रद्धा सावंत भोसले यांच्यासह भाजपाचे 11 नगरसेवक निवडून आले होते. तर शिंदे शिवसेनेचे सात नगरसेवक निवडून आले. तर काँग्रेस आणि ठाकरे सेना यांचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला. केंद्रात तसेच राज्यात महायुतीचे सरकार असल्याने जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये महायुती होण्याची शक्यता आहे. परंतु महायुती झाल्यास या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पाहायला मिळणार आहे. एकूणच याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाकडून आपापल्या नगरसेवकांचे स्वतंत्र गट स्थापन केले आहेत. यावेळी नगरसेवक संजू परब, नगरसेवक अजय गोंदावळे, नगरसेवक देव्या सूर्याजी नगरसेविका शर्वरी धारगळकर, नगरसेविका अँड सायली दुभाषी, नगरसेविका स्नेहा नाईक, उपस्थित होते.