Murgud Municipal Council : मुरगुड नगरपालिकेत शिवसेना-भाजप आघाडीचा दणदणीत विजय
मुरगुडमध्ये शिवसेना-भाजपचे वर्चस्व; 16 जागांवर विजय
मुरगुड : कागल तालुक्यातील मुरगुड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी खासदार संजय मंडलिक आणि प्रवीणसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 13-भाजप 3 अशा आघाडीने 16 जागा जिंकल्या. नगराध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुहासिनी प्रवीणसिंह पाटील यानी राष्ट्रवादीच्या तसीनम राजेखान जमादार यांचा दीड हजाराचे मताधिक्य घेऊन विजयी झाल्या. विरोधी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीला केवळ 3 जागा तर समरजीतसिंह घाटगे यांच्या शाहू आघाडीला केवळ 1 जागेवर यश मिळाले.
राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तसीनम राजेखान जमादार यांच्या पराभवाबरोबर त्यांचे पती व याअगोदरच्या पालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेखान कादरखान जमादार या दोघा पती-पत्नीला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांचा पराभव मंडलिक गटाला धक्कादायक मानला गेला आहे. माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. पालिकेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पार्टीने 3 नगरसेवकाच्या रुपाने पालिकेत दमदार प्रवेश केला आहे.
पुतण्या विजयी- चुलती पराभूत
मंजुषादेवी पाटील आणि सत्यजित पाटील हे चुलती-पुतणे नगरसेवक पदासाठी एकमेका विरोधातील आघाडीतून उभे होते. यामधील पुतण्या सत्यजित अजितसिंह पाटील विजयी झाले तर चुलती मंजुषादेवी रणजीतसिह पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
पती-पत्नीच्या दोन जोड्या पराभूत
नगराध्यक्ष पदासाठी तसीनम जमादार तर नगरसेवक पदासाठीचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेखान जमादार तसेच अपक्ष उमेदवार वर्षाराणी मेंडके व सचिन मेंडके अशी पती-पत्नीच्या दोन जोड्या पराभूत झाल्या.
सोनूलेंची विजय परंपरा कायम
1972 पासून ज्ञानू सोनुले यांची 2 वेळा बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आनंदा सोनूले व त्याच कुटूंबातूनबजरंग सोनूले निवडून उपनगराध्यक्ष झाले. तर त्यांच्या पत्नी गौराबाई सोनूले 1989 पासून नगरसेवक व नंतर त्यांना नगराध्यक्ष पदाची ही संधी मिळाली. अटीतटीच्या लढतीत बजरंग सोनुलेंनी विजयी प्राप्त करत घराण्याची विजयी परंपरा कायम ठेवली.