For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘शिवसेना ठाकरेंचीच’; सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद, धनुष्यबाणाबाबत केल्या दोन मोठ्या मागण्या

04:20 PM Aug 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘शिवसेना ठाकरेंचीच’  सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद  धनुष्यबाणाबाबत केल्या दोन मोठ्या मागण्या
Advertisement

नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयातील आपला सात दिवसांचा युक्तिवाद पूर्ण केला. आमदारांच्या अपात्रतेपासून ते विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांपर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडल्यानंतर सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाच्या शेवटी शिवसेना हा उद्धव ठाकरेंचाच पक्ष असल्याचा दावा करत दोन महत्त्वपूर्ण मागण्या न्यायालयासमोर ठेवल्या.

Advertisement

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाच्या निकालाचा तसेच विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा संदर्भ देत सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली.

‘पक्षांतराला थारा देऊ नका’

आपला युक्तिवाद संपवताना कपिल सिब्बल यांनी ‘किहोतो होलोहन’ प्रकरणातील दोन परिच्छेदांचा संदर्भ दिला. पक्षांतर करणे हे राजकीयदृष्ट्या चुकीचे असून, पक्षांतराला प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने दहाव्या अनुसूचीचा अर्थ लावू नये, असा युक्तिवाद त्यांनी केला.

Advertisement

कर्नाटकातील एका प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचाही त्यांनी यावेळी दाखला दिला. पक्षांतराच्या माध्यमातून एखाद्या पक्षावर दावा करता येणार नाही, असा युक्तिवाद करत सिब्बल यांनी शिंदे गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.

‘शिवसेना हा ठाकरेंचाच पक्ष’

सिब्बल यांनी न्यायालयात ठामपणे सांगितले की, शिवसेना हा उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे आणि तो एकनाथ शिंदे यांचा होऊ शकत नाही. शिंदे गटाने पक्षाच्या नावाचा आणि चिन्हाचा राजकीय फायदा घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

त्यांच्या मते, पक्षातील काही आमदारांनी केलेल्या बंडाच्या आधारे संपूर्ण पक्षावर किंवा पक्षाच्या मूळ ओळखीवर दावा करता येणार नाही.

सिब्बलांच्या दोन मोठ्या मागण्या

युक्तिवादाच्या अखेरीस कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या.

पहिली मागणी : शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांचेच असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने द्यावा.

दुसरी मागणी : ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देऊ नये. जर हे चिन्ह उद्धव ठाकरे गटालाही देता येणार नसेल, तर ते गोठवण्यात यावे, अशी मागणी सिब्बल यांनी केली.

शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा सुरू असलेला वापर योग्य नसून तो बेकायदेशीर असल्याचा दावाही त्यांनी केला.

आता शिंदे गटाच्या युक्तिवादाकडे लक्ष

उद्धव ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर आता या प्रकरणात शिंदे गटाच्या वतीने मांडण्यात येणाऱ्या युक्तिवादाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना कोणाची, पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाकडे राहणार, तसेच पक्षांतर आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Advertisement
Tags :

.