शिवसेनेपाठोपाठ सर्वच पक्ष आक्रमक; पक्ष देईल...तो उमेदवार स्विकारावाच लागेल
घालमेल वाढणार, पक्ष- आघाडीचे धोरण राहणार अंतीम
संतोष पाटील कोल्हापूर
लागोपाठ होणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्ष आणि आघाडी जो ठरवेल तोच उमेदवार मान्य करावा लागणार आहे. उमेदवारीबाबत भाजपच्या वरिष्ठांना कधीच दबाव मान्य नसतो. निवडणुकीच्या तोंडावर दबाव टाकण्याचा प्रयत्न अजिबात सहन केला जाणार नाही, पक्षफुटीनंतर अधिक संवेदनशील झालेल्या उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना निलंबित करुन स्पष्ट केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती-आघाड्या करताना इच्छुकांच्या मांदियाळीत बंडखोरीची हवा तापलेली असणार आहे. कोल्हापुरात निलंबनातून ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्याचे प्रतिध्वनी यापुढे राज्याच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडोखोरांवर लागू होताना दिसतील. पक्ष-आघाडी देईल तोच उमेदवार मान्य करावा लागेल, यानंतर निवडणुकीत जो प्रामाणिक काम करेल, त्याचाच पक्ष विचार करेल, हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुतोवाचही यानिमित्ताने सत्यात उतरताना दिसेल.
कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना ठाकरे गटाने 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या साथीने जिंकल्या होत्या. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी जाण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही जागांवर महायुतीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि तर भाजप आघाडीत शिंदे गटाने नैसर्गिक न्यायाने दावा केला. महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. तर भाजपमध्ये अलाकमान जे सांगतील तोच उमेदवार रिंगणात असेल, त्यावर अपील करण्याचा किंवा चकार शब्द काढण्याची हिंमत कोणी दाखवण्याची शक्यता नसल्यात जमा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही कडक धोरण आखले असल्याचे कर्नाटकातील गृहकलहातील वाद मिटवताना दिसले. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, पक्ष घेईल तो निर्णय सर्वांना मान्य करावाच लागेल, लोकसभेला पक्ष धोरणानुसार राबणाऱ्यांचे पक्षात उज्वल राजकीय भवितव्य असेल, असा इशारावजा दम राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकाजुर्न खरगे यांनी यापूर्वीच दिला आहे.
महायुतीच्या जागा वाटपात कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे तर हातकणंगलेची जागा राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडे देण्यात येणार आहे. हातकणंगलेतून महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी मैदानात असतील, असे संकेत आहेत. यामुळे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी उमेदवारीवरुन इशारा दिला. जाधव यांना यापूर्वी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वैयक्तिक लक्ष घालत गोकुळ दूध संघाचे संचालक केले होते. जाधव यांनी बंडाचे निशान वर करण्यापूर्वीच ठाकरे यांनी त्यांचे पक्षातून निलंबन केले. याचीच पुनरावृत्ती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात होऊ शकते. कोल्हापुरातून डॉ. चेतन नरके यांचे नाव चर्चेत आघाडीवर जाताच पक्षातील काहींनी ‘मातोश्री’वर ‘लॉबींग’ सुरू केले आहे. तर महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपला बी पार्ट मैदानात उतरवण्याची खेळी सुरू केली आहे. काही नेत्यांकडून स्थानिक सहकाराचे राजकारण सोपे व्हावे, यासाठी मैत्री जपण्याचाही प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.
ठाकरे यांच्या कठोर निर्णयामुळे जिह्यातील संभाव्य बंडाला आळा बसणार आहे. याशिवाय महाराष्ट्रभर उमेदवारीवरुन येऊ शकणाऱ्या धमकीवजा इशाऱ्यांना आपोआपच उत्तर मिळणार आहे. ठाकरे यांनी केलेली ही आक्रमक खेळी कोल्हापूरसह राज्यात रामबाण उपाय ठरेल. थांबणारे थांबा जाणारे जाऊ शकतात, असा संकेत ठाकरे यांनी या नाजूक राजकीय स्थितीतही दिल्याने येत्या काळात शिवसेना तसेच महाविकास आघाडीत अधिक जलद खेळी करेल, यात शंका नाही.
राज्यात सत्तांतरानंतर नेत्यांची राजकीय अस्तित्वाची इर्षा, इच्छुकांच्या लोकसभा-विधानसभेच्या जोडण्या, प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्याची रणनिती, एका बाजूला विकासकामांची स्पर्धा तर दुसऱ्या बाजूला आपण राजकीय स्पर्धेत राहू की नाही, याची चिंता, स्टेटसवरुन सामाजिक वाद, अशा दोलायमान वातावरणामुळे प्रथमच राजकीय संभ्रमावस्थेनं टोक गाठले आहे. कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल, मतदारांचा कौल काय असेल, नवी आघाडी आणि बिघाडी कशी होईल, यातूनही उमेदवारी मिळालीच तर विजयाची खात्री नाही, काहीशा स्तब्ध अशा राजकीय वातावरणात सर्वपक्षीय उमेदवारांसह नेत्यांचा जीव टांगणीला लागला असला तरी आक्रमक राजकारणाची कास कायम राहणार आहे.
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरकरांनी प्रस्थापितांचा धक्का देण्याची आपली परंपरा कायम राखली. विधानसभेसाठी काँग्रेसने भोपळा फोडला तर भाजपला शुन्यावर ठेवले. शिवसेना सहावरुन एका जागेवर घसरली. राजू शेट्टी आणि धनंजय महाडिक या दिग्गजांचे पुन्हा दिल्लीचे स्वप्न भंगले. कोल्हापूरकरांनी दोन अपक्षांना विधानसभेत पाठवले. राष्ट्रवादीचा दोन आमदारांचा कोटा कायम राखला. भाजपच्या प्रचारातील भगवा, हिंदुत्व, धर्म आदी मुद्दे मतदारांना भुरळ घालू शकतात, मात्र विजयाचा गुलाल उधळण्यापर्यंत नेण्याची फेरमांडणी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या साथीने शिंदे गटाला टार्गेट करत भाजपला विरोध हा एकच अजेंडा घेऊन उध्दव ठाकरे यांची शिवसेना मैदानात उतरेल. महाविकास आघाडीसह शिवसेनेचा पारंपरिक मतदार आणि सहाभुतीच्या लाटेवर स्वार असलेल्या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मोठे आव्हान भाजप-शिंदे गटापुढे असेल. मैदान निश्चित आहे, उमेदवारांचे चेहरे ठरलेले आहेत. फक्त कोण कोणत्या झेंड्याखाली लढणार, हे अनिश्चित आहे. यातच कोल्हापुरातील मागील काही वर्षातील परिवर्तनाचे राजकारण पाहता अंदाज बांधणे कठीण असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
प्रत्येकाचे होणार परीक्षण
भाजपने प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून सर्वपक्षीय अशा संभाव्य निवडून येऊ शकणाऱ्या बारा जणांची यादी केली आहे. भाजप उमेदवारी देताना सर्वेक्षणाचा आधार घेत आहे. शिवसेना आणि काँग्रेसनेही त्रयस्थ संस्थांमार्फत सर्वेक्षण केले आहे. अजून एक सर्वेक्षण बाकी आहे. प्रतिस्पर्धी जिंकता कामा नये, हाच अजेंडा घेऊन सर्व पक्ष मैदानात उतरत असताना, जिह्यातील राजकीय वैर आणि मैत्री यामध्ये खोडा घालू शकते. पक्षाचा अजेंडा सोडून जिल्हास्तरावर मनमानी रोखण्याचा काटेकोरपणे प्रयत्न होणार आहे. पक्षात राहून केलेले बंड दोन्ही बाजूंनी सहन केले जाणार नाही. निवडणूक कालावधीतही पक्षातील नाराज काय करतात, यासह मात्तबर नेत्यांवर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो की नाही, हे पाहण्यासाठी त्रयस्थ यंत्रणा लक्ष ठेवून असणार आहे. निवडणूक निकालानंतर याची गोळाबेरीज होऊन राबणाऱ्याला योग्य स्थानी पाठवले जाणार असल्याने आताच आपल्या नको असलेला उमेदवाराचा पत्ता कट करण्याच्या कुरघोड्या जोरात सुरू झाल्या आहेत.