महामार्गावर शिवसैनिकांना अडविले
वार्ताहर/ कोगनोळी
1 नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा राज्योत्सव म्हणून तर मराठी भाषिकांचा काळा दिवस म्हणून पाळला जातो. यासाठी कर्नाटक राज्यातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, शिवसेना उबाठा गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, शिवसेना नेते संजय पवार हे बेळगावला जात होते. त्यांना कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील दूधगंगा पुलावर कर्नाटक पोलिसांनी रोखून धरले. याबद्दल वरील नेत्यांनी कर्नाटक पोलिसांचा निषेध व्यक्त केला. पोलिसांनी दूधगंगा नदीच्या पुलावरून त्यांच्या वाहनाला महाराष्ट्रात परत पाठविले. यावेळी कर्नाटक व महाराष्ट्रातील पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाटक पोलिसांकडून दूधगंगा नदी पुलावर अडथळे उभा करून वाहनांची तपासणी सुरू होती. त्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
मराठी भाषिक जनतेला वेठीस धरणाऱ्या कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा जोरदार घोषणा देत कोल्हापूर जिल्हा शिवसेनेतर्फे येथील राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन छेडून महामार्ग रोखून धरला. शिवसैनिकांनी कर्नाटक प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध करून घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने म्हणाले, आमची एवढीच विनंती आहे की, आम्ही शांतताप्रिय मार्गाने त्या ठिकाणी जातो, लोकांना भेटतो. आमच्या भावना, त्यांच्या संवेदना आमच्यापर्यंत या ठिकाणी आहेत. मुस्कटदाबीची भूमिका या ठिकाणी सातत्याने कर्नाटक सरकार घेत आहे आणि आमच्या लोकांना त्रास देण्याचे काम तिथे करत आहे. आम्ही हा त्रास आमच्या लोकांना होऊ देणार नाही. आपल्या लोकांच्या संरक्षणार्थ महाराष्ट्र शासन सातत्याने या ठिकाणी न्यायालयामध्ये लढाई लढत आहे. कर्नाटक शासनाने ती न्यायालयात लढावी ना?, जर न्याय्यहक्कासाठी ते या ठिकाणी आमच्यासारख्यांना आत येण्यापासून सुद्धा रोखत असतील तर त्याचा सुद्धा जबाब त्यांना त्या ठिकाणी द्यावा लागेल आणि एका खासदाराला एक जिल्हाधिकारी अशा पद्धतीची नोटीस देत असेल तर तो हक्कभंग आहे, असेही खासदार धैर्यशील माने म्हणाले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना उबाठा गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, 1 नोव्हेंबर या दिवशी दरवर्षी मराठी भाषिक गेली अनेक वर्षे सायकल फेरी काढतात. या फेरीस उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषिकांचा भव्य मेळावा मराठा मंदिर येथे होत आहे. तेथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मला निमंत्रण मिळाले होते. त्या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षातर्फे जात होतो. कर्नाटक सरकारचे महाराष्ट्राबद्दलचे पुतना मावशीचे प्रेम यावेळी दिसून आले. मराठी माणसाला चारही बाजूने परवानगी द्यावयाची नाही असे कर्नाटकातील बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख आणि कार्यकारी दंडाधिकारी यांचे धोरण असते. महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून बेळगावकडे निघालो असता कर्नाटक-महाराष्ट्र सरहद्दीवर मला अडविले असले तरी महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचा आवाज दाबला जाणार नाही. मात्र कर्नाटक जेवढी दडपशाही करेल तेवढा लढा तीव्र होतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा सुरू आहे. आजच्या या दडपशाहीचा मी उबाठा व मराठी बांधवांतर्फे तीव्र निषेध करतो, असे ते म्हणाले. दरम्यान उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीमा ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना रोखून धरले. घोषणाबाजी करत या सर्वांना पोलीस गाडीतून पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
पोलीस छावणीचे स्वरुप
महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते कर्नाटकमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळताच आज सकाळपासूनच दूधगंगा नदी पुलावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार आणि निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार शिवराज नाईकवडी यांच्या नेतृत्वाखाली अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सकाळी महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते भगवे झेंडे घेऊन दूधगंगा पुलावर येताच त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी दूधगंगा नदी परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.
महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी
ही घटना घडत असताना महामार्गावर महाराष्ट्राच्या हद्दीत 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना परत पाठविल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. महाराष्ट्रातील नेतेमंडळी कर्नाटकात जाऊ नयेत यासाठी कर्नाटकचे पोलीस महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करीत होते.
यावेळी चिकोडीचे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, उपनिरीक्षक रमेश पवार, साहाय्यक फौजदार विजय पाटील यांच्यासह सुमारे 50 पोलिसांचा ताफा तसेच कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.