For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कोगनोळी महामार्गावर शिवसैनिकांची अडवणूक

07:58 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोगनोळी महामार्गावर शिवसैनिकांची अडवणूक
Advertisement

महामार्गाला पोलीस छावणीचे स्वरुप : दूधगंगा नदी पुलावर वाहनांची तपासणी : महामार्गावर लांबच लांब रांगा

Advertisement

 त. भा. वार्ताहर

कोगनोळी : 1 नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा राज्योत्सव म्हणून तर मराठी भाषिकांचा काळा दिवस म्हणून साजरा केला जातो. यासाठी कर्नाटक राज्यातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कोल्हापूर सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे हे बेळगावला जात होते. त्यांना कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील दूधगंगा पुलावर कर्नाटक पोलिसांनी रोखून धरले. याबद्दल वरील नेत्यांनी कर्नाटक पोलिसांचा निषेध केला. पोलिसांनी दूधगंगा नदीच्या पुलावरून त्यांच्या वाहनाला महाराष्ट्रात परत पाठविले. यावेळी कर्नाटक व महाराष्ट्रातील पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाटक पोलिसांकडून दूधगंगा नदी पुलावर अडथळे उभे करून वाहनांची तपासणी सुरू होती. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Advertisement

मराठी भाषिक जनतेला वेठीस धरणाऱ्या कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, कर्नाटक सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, बेळगाव, निपाणी, कारवार,  बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत कोल्हापूर जिल्हा व कागल तालुका शिवसेनेतर्फे येथील राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन छेडून महामार्ग रोखून धरण्यात आला.  शिवसैनिकांनी कर्नाटक प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध करुन घोषणाबाजी केली.

यावेळी बोलताना शिवसेना उबाठा गटाचे कोल्हापूर सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, बेळगाव जिह्यातील मराठी भाषिक आज काळा दिन म्हणून साजरा करतात. मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि मंत्री शंभूराजे देसाई हे दोन समन्वय मंत्री नेमले आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक मधला समन्वय करायचा आहे. गेली चार ते पाच वर्षे कर्नाटकचे जिल्हा पोलीस प्रमुख असतील, मुख्यमंत्री असतील गळेचेपीची भूमिका करतात. आज साडेतीन लाख मराठी बांधव बेळगावमध्ये आहेत. त्यांच्या अस्मितेचा प्रश्न असताना जर कर्नाटक सरकार आम्हाला अमानुष पद्धतीची वागणूक देत असेल आणि महाराष्ट्राचे सरकार मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. ते महाराष्ट्र सरकार जर मराठी माणसाच्या पाठीमागे उभे राहत नसेल तर त्या पद्धतीने योग्य नाही. आम्हाला जाऊ द्या, आमच्या मराठी माणसाला भेटू द्या, आमचा जो काळा दिन आहे, ज्याची रॅली आहे, त्या रॅलीमध्ये आम्हा शिवसैनिकांना सहभागी व्हायचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे म्हणाले, बेळगावमध्ये जे आपले मराठी बांधव आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेतर्फे शिनोळी नाक्यावर आम्ही जात असताना कर्नाटक पोलीस व महाराष्ट्र पोलिसांनी आम्हा शिवसैनिकांना याठिकाणी रोखून धरले आहे. कर्नाटक सरकार व केंद्र सरकारने जो मराठी माणसांचा लढा, सीमाप्रश्न, निपाणी, भालकी, कारवार, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी सातत्याने बेळगावमध्ये मराठी माणसे जे आंदोलन करत आहेत, त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आणि या ठिकाणी आम्ही कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी काळ्याफिती लावून कर्नाटकात चाललो होतो. बेळगाव, निपाणी भागात जात असताना आम्हाला याठिकाणी पोलिसांनी रोखून धरले. आम्ही कर्नाटक सरकारचा निषेध करुन हा सीमाप्रश्न सुटल्याशिवाय गप्प बसणार नाही. शिवसेनेचे आंदोलन थांबणार नाही आणि बेळगावमधील मराठी माणसाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान कोल्हापूर सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांच्यासह सहक्रायांनी सीमा ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना रोखून धरले. घोषणाबाजी करत या सर्वांना पोलीस गाडीतून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ही घटना घडत असताना महामार्गावर महाराष्ट्राच्या हद्दीत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी चिकोडीचे डीएसपी गौपाळकृष्ण गौडर, निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक बी.एस.तळवार, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार शिवराज नाईकवाडी, फौजदार रमेश पवार यांच्यासह सुमारे शेकडो पोलिसांचा ताफा तसेच कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

यावेळी अवधूत साळोखे, राजू जाधव, विराज पाटील, विशाल देवकुळे, राजू यादव, प्रकाश पाटील, विनोद खोत, साताप्पा नरके, मारुती पुरीबुवा, दिग्विजय पाटील, चंद्रकांत भोसले, दिपाली घोरपडे, विकास पाटील, सतिश पाणारी, सागर पाटील, सरदार टिप्पे, अशोक पाटील, म्हाळू करीकट्टे, दिलीप पाटील, प्रभाकर थोरात, राहुल घोरपडे, वैभव आडके यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महामार्गाला पोलीस छावणीचे स्वरुप

महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते कर्नाटकमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळताच आज सकाळपासूनच दूधगंगा नदी पूलावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक बी.एस.तळवार आणि निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार शिवराज नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली अन्य पोलीस अधिकारी व कर्मच्रायांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सकाळी महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते भगवे झेंडे घेऊन दूधगंगा पूलावर येताच त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी दूधगंगा नदी परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

Advertisement
Tags :

.