‘त्या’ विधानाबाबत शिवप्रतिष्ठानचे धारकरी आक्रमक
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सरोज एन. पाटील यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडेगुरुजी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. गुरुवारी ज्योती महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या वादग्रस्त विधानाने संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी ज्योती महाविद्यालय परिसरात जाऊन निषेध नोंदविला. शिवाय काही धारकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने व्याख्यान थांबवावे लागले. दहा-पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवप्रतिष्ठानच्या भिडेगुरुजींबाबत सरोज पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते. याचे पडसाद बेळगावातही उमटले आहेत. बेळगाव येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शिवाय या वादग्रस्त विधानाबाबत सरोज पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी देखील धारकऱ्यांनी केली आहे.
पोलीस बंदोबस्त
ज्योती महाविद्यालयाच्या आवारात पोलीस दाखल झाले होते. व्याख्यानादरम्यान धारकरी आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन धारकऱ्यांना शांत राहण्याची विनंती केली.
पुरोगामी संस्थाकडून धर्माविरोधी विचारांनाच खतपाणी
याबाबत आपली प्रतिक्रिया देताना किरण गावडे म्हणाले की, संस्थेच्या अध्यक्षा सरोज पाटील यांनी भिडेगुरुजींच्या संदर्भात अत्यंत अनुदार उद्गार काढले आहेत. तसेच या पुरोगामी संस्था धर्माविरोधी विचारांनाच खतपाणी घालत आहेत. जे आम्ही खपवून घेणार नाही. त्यासाठी आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ.
- किरण गावडे