शिवजयंती चित्ररथ मिरवणूक १ मे रोजी
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत निर्णय : पारंपरिक वाद्यांसह देखावे सादर केले जाणार
बेळगाव : शतकोत्तर परंपरा लाभलेली बेळगावची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक यावर्षी गुरुवार दि. 1 मे रोजी होणार आहे. शिवजयंती उत्सव मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. मिरवणुकीला कोठेही बाधा पोहोचेल असे कृत्य कोणत्याच मंडळाने करू नये. त्याचबरोबर चिमकुल्यांसह वयोवृद्धांना मिरवणूक पाहता यावी यासाठी चित्ररथ मिरवणूक लवकर सुरू करण्याची सूचना मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. मंगळवारी जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीत शिवजयंती साजरी करण्याबाबत सूचना मांडण्यात आल्या. माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. पारंपरिक शिवजयंतीनिमित्त मंगळवार दि. 29 रोजी सकाळी 7 वाजता शिवज्योतींचे धर्मवीर संभाजी चौक येथे स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता नरगुंदकर भावे चौक येथे शिवप्रतिमेचे पूजन होईल. तर 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवमूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे.
गुरुवार दि. 1 रोजी सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौक येथून पालखी पूजनाने चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. 4 मे रोजी राजहंसगड चढणे-उतरणे ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी चेंगराचेंगरीदेखील होत आहे. त्यामुळे मिरवणूक वेळेत सुरू करून कोठेही चेंगराचेंगरी होणार नाही, यासंदर्भात सूचना मांडण्यात आल्या. त्याचबरोबर शहापूर येथील मंडळांना धर्मवीर संभाजी चौक येथे मुख्य मिरवणुकीत लवकर प्रवेश मिळावा अशीही सूचना करण्यात आली. प्रत्येक मंडळाला दोन ते अडीच लाख रुपये खर्च येत असल्यामुळे त्यांना वेळेत देखावे सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी प्रकाश मरगाळे, मदन बामणे, रणजित चव्हाण-पाटील, रमेश पावले, विजय पाटील, दत्ता जाधव, अंकुश केसरकर, प्रशांत भातकांडे, शिवराज पाटील, राजू मरवे, रणजित हावळाणाचे, संतोष कृष्णाचे, सचिन केळवेकर, सागर पाटील यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डीजे मुक्तीसाठी मंडळांनीच पुढाकार घ्यावा
बेळगाव शहरात काढण्यात येणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला ऐतिहासिक महत्त्व आहे. सजीव देखावे हे बेळगावच्या मिरवणुकीचे भूषण आहे. परंतु मागील काही वर्षांत डीजेचा दणदणाट वाढत आहे. काही डीजेंचा आवाज इतका असतो की सजीव देखावे सादर करणेही अशक्य असते. त्यामुळे देखावे सादर करणाऱ्या मंडळांची संख्या प्रत्येक वर्षी कमी होत आहे. यामुळे डीजे मुक्त बेळगावची मिरवणूक करून शिवरायांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मंडळांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.