For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवजयंती उत्सव तयारीला मंडळांकडून वेग

10:27 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवजयंती उत्सव तयारीला मंडळांकडून वेग
Advertisement

ढोलताशा-लेझीम पथकांचा सराव : चित्ररथ मिरवणुकीसाठी साहित्याची जमवाजमव : यंदा शहरात 50 ते 60 मंडळांकडून सजीव देखाव्यांचे सादरीकरण

Advertisement

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र प्रसंगांच्या माध्यमांतून सादर करत बेळगावमध्ये भव्यदिव्य अशी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षी शनिवार दि. 11 मे रोजी चित्ररथ मिरवणूक होणार असल्याने केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. यामुळे शिवचरित्रातील प्रसंग सादर करण्यासोबतच ढोलताशा, लेझीम, ध्वजपथक, मर्दानी खेळ सादर करणाऱ्या तरुणाईकडून जोरदार तयारी केली जात आहे. बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते. मुंबई, पुणे, कोल्हापूरपेक्षाही मोठी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक बेळगावमध्ये काढली जात असल्याने बेळगावसह खानापूर, कोल्हापूर, चंदगड तसेच कानडी भागातूनही हजारो शिवभक्त शहरात दाखल होतात. 60 ते 70 शिवजयंती मंडळे चित्ररथामध्ये सहभागी होतात. शिवरायांचा जाज्ज्वल्य इतिहास युवापिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी सजीव देखावे सादर केले जातात. शिवचरित्रातील हुबेहूब प्रसंग सादर केले जात असल्याने ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात  गर्दी होते.

50 ते 60 मंडळांकडून सजीव देखावे

Advertisement

चित्ररथ मिरवणुकीसाठी पात्रांची निवड, प्रसंगाची निवड महत्त्वाची असते. त्याचबरोबर देखावा साकारण्यासाठी वाहनाची ट्रॉली, जनरेटर यासह इतर साहित्याची जमवाजमव करावी लागते. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने जनरेटर उपलब्ध होताना अडथळे येत आहेत. त्यामुळे मंडळांना अॅडव्हान्स बुकिंग करावे लागत आहे. यावर्षीही शहरात 50 ते 60 मंडळांकडून सजीव देखावे सादर करण्याची तयारी केली जात आहे.

निवडणुकीमुळे तयारीत व्यत्यय

सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहेत. यामुळे चित्ररथ मिरवणुकीच्या तयारीत व्यत्यय येत आहे. चित्ररथावर काम करणारे तरुण प्रचारामध्ये असल्यामुळे रंगीत तालीम करताना अडचणी येत आहेत. तसेच आचारसंहिता असल्यामुळे ढोलताशा, ध्वजपथक यांना एकाच वेळी उपस्थित राहून सराव करताना प्रशासनाकडून आडकाठी आणली जात आहे. त्यामुळे मंगळवार दि. 7 रोजी निवडणुका संपल्यानंतरच शिवजयंतीच्या तयारीला वेग येणार आहे.

मध्यवर्ती शिवजयंती मंडळाचे आवाहन

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही पारंपरिक पद्धतीने शिवजयंती व चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. गुरुवार दि. 9 मे रोजी सकाळी 7 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे शिवज्योतीचे स्वागत केले जाणार आहे. सकाळी 9 वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व आरती तर सकाळी 10 वाजता शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. शनिवार दि. 11 रोजी सायंकाळी 6 वाजता पालखी पूजन करून नरगुंदकर भावे चौकातून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार असल्याचे मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.