For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मार्गाचा घेतला आढावा

10:44 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मार्गाचा घेतला आढावा
Advertisement

पोलीस आयुक्तांकडून बंदोबस्ताची पाहणी : अधिकाऱ्यांशी केली चर्चा

Advertisement

बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व उपनगरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी शुक्रवारी आपल्या अधिकाऱ्यांसह मिरवणूक मार्गाची पाहणी केली. मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पाडावी यासाठी पोलीस दलाने व्यापक तयारी केली आहे. पोलीस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदींसह शहरातील इतर अधिकाऱ्यांनीही शुक्रवारी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी बंदोबस्त कसा असावा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर कोठे असावी, पोलीस कोठे तैनात करावेत आदांविषयी आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यासंबंधी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असता आपण स्वत:सह दोन डीसीपी बंदोबस्तावर नजर ठेवून असणार आहेत. परजिल्ह्यातूनही अधिकारी व पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. दोन हजारहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलीस कंट्रोलरूममध्ये त्याचे नियंत्रण असणार आहे. प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष असणार आहे, असे त्यांनी सांगितले. चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होते. लहान मुले, महिला, वृद्धही मिरवणुकीत सहभागी होतात. त्यामुळे अत्यंत शांततेने मिरवणूक पार पाडावी, शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला. मिरवणूक मार्गावर अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

Advertisement

शनिवार दि. 11 मे रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी शुक्रवारी सायंकाळी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शनिवारी दुपारी 2 पासून मिरवणूक संपेपर्यंत हा बदल असणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्तांनी केले आहे. चन्नम्मा चौकापासून कॉलेज रोडमार्गे खानापूर रोडकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. चन्नम्मा चौकापासून क्लब रोडमार्गे महात्मा गांधी सर्कल (अरगन तलाव), शौर्य चौक, मिलिटरी हॉस्पिटल, केंद्रीय विद्यालय नं. 2, शरकत पार्क, ग्लोब थिएटर मार्गे खानापूर रोडवर वळविण्यात येणार आहे. जिजामाता सर्कलपासून देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक, कंबळी खूट, पिंपळकट्टा, पाटील गल्लीतून जाणारी वाहतूक जिजामाता सर्कलपासून जुन्या पी. बी. रोडवर वळविण्यात येणार आहे. गोवावेसहून नाथ पै सर्कल, बँक ऑफ इंडियामार्गे कपिलेश्वर उ•ाण पुलावरून जाणारी वाहतूक बँक ऑफ इंडियाजवळ वळविण्यात येणार असून शिवचरित्र रोड, वैभव हॉटेल क्रॉस, जुन्या पी. बी. रोडवर वळविण्यात येणार आहे.

जुना पी. बी. रोड, व्हीआरएल लॉजिस्टिक, भातकांडे स्कूलमार्गे कपिलेश्वर उड्डाण पुलाकडे जाणारी वाहने शिवाजी उद्यान, बँक ऑफ इंडिया क्रॉस, महात्मा फुले रोडवर वळविण्यात येणार आहेत. जुना पी. बी. रोड, यश इस्पितळ, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिरमार्गे उड्डाणपुलाकडे जाणारी वाहने यश इस्पितळाजवळ वळविण्यात येणार. भातकांडेकडून तानाजी गल्ली रेल्वेगेट मार्गे त्यांना पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. गुड्सशेड रोड मार्गे कपिलेश्वर उड्डाण पुलाकडे येणारी वाहतूक एसपीएम रोडकडे न येता मराठा मंदिर, गोवावेस सर्कलकडे वळविण्यात येणार आहे. खानापूर रोड, बीएसएनएल क्रॉस, स्टेशन रोड, गोगटे सर्कलहून रेल्वेस्टेशन, पोस्टमन सर्कलद्वारे शनिमंदिराकडे जाणारी वाहने ग्लोब सर्कलजवळ डाव्या बाजूने शरकत पार्क, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शौर्य चौक, महात्मा गांधी सर्कल, क्लब रोड, चन्नम्मा सर्कल मार्गे वळविण्यात येणार आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने उभी करण्यास निर्बंध

मिरवणूक मार्गावर नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनिमंदिर, रेणुका हॉटेल, कपिलेश्वर मंदिर परिसरात शनिवार दि. 11 मे च्या दुपारी 2 पासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने उभी करण्यास निर्बंध असणार आहे. मिरवणूक मार्गावर सर्वतऱ्हेची वाहने उभी करण्यास निर्बंध असणार असून धर्मवीर संभाजी चौक परिसरात सायंकाळी 4 पासून वाहतूक वळविण्यात येणार आहे. मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांनी सरदार्स मैदानावर आपली वाहने उभी करून पायी चालत मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.