शिरुर रस्ता तब्बल 17 दिवसांनी खुला
काही अटींवर एका बाजूची वाहतूक सुरू : मुसळधार पावसामुळे 9 तालुक्यातील शाळांना आज सुटी
कारवार : शिरुर येथील त्या दुर्घटनेनंतर तब्बल सतरा दिवसानंतर राष्ट्रीय हमरस्ता 66 वाहतुकीला (एका बाजूने) खुला करण्यात आला. अंकोला तालुक्यातील शिरुर येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर 16 जुलै रोजी दरड कोसळली होती. राष्ट्रीय हमरस्त्यावर समोर अर्धाकिलो मीटर लांब आणि 20 फूट उंच इतकी दरड कोसळली होती. दरड आठवडाभराच्या अथक परिश्रमानंतर हटविण्यात आली होती. दरड हटविल्यानंतर 8 ते 9 दिवस हा रस्ता खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीस खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे गोवा-मंगळूर, हुबळी-मंगळूर या प्रमुख रस्त्यावरील वाहतूक सलग 17 दिवस ठप्प झाली होती. परिणामी या रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची फार मोठी गोची झाली होती. आता कारवारच्या जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय हमरस्ता प्राधिकारच्या अधिकाऱ्यांनी काही अटींसह एका बाजूने वाहतुकीसाठी मार्ग खुला केला आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ या पाच तालुक्यात पावसाचा मारा सुरूच आहे. कारवार आणि होन्नावर तालुक्यात एका बाजूला होत असलेली जोरदार पर्जन्यवृष्टी आणि दुसऱ्या बाजूला कद्रा, गिरसप्पा व लिंगनमक्की धरणांतून होत असलेल्या विसर्गामुळे या दोन्ही तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात होन्नावर तालुक्यात 9, कारवार आणि कुमठा तालुक्यात प्रत्येकी 2 व अंकोला तालुक्यात 1 अशी एकूण 14 निवारा केंद्रे सुरू करुन 503 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कुमठा तालुक्यात गोकर्ण जवळच्या नाडूमास्केरी ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील आवीकोडला येथे पावसाच्या पाण्यामुळे सुमारे 20 घरे जलमय झाली आहेत. शिवाय शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.
जिल्ह्याला पाऊस झोडपून काढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनिवार दि. 3 रोजी कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर, भटकळ, दांडेली, जोयडा, शिरसी, सिद्धापूर या 9 तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, आयटीआय आणि डिप्लोमा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 77.7 मि.मी. आणि सरासरी 66.6 मि.मी. पाऊस झाला आहे. याच कालावधीत अंकोला तालुक्यात 100 मि.मी., भटकळ 98, होन्नावर 105, कारवार 107 आणि कुमठा तालुक्यात 93 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस
जिल्ह्यातील कद्रा-163 मि.मी., कोडसळ्ळी-113 मि.मी., सुपा 59 मि.मी., गिरसप्पा-130 मि.मी., लिंगनमक्की-85 मि.मी. पाऊस झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या धरणातून अतिरिक्त पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. कद्रा धरणातून 58 हजार, कोडसळ्ळी धरणातून अंदाजे 40 हजार, गिरसप्पा धरणातून 52 हजार, लिंगनमक्की धरणातून 17 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे काळी नदीच्या काठावरील (कारवार तालुका) आणि शरावती नदीच्या काठावरील (होन्नावर तालुका) नागरिक भीतीच्या छायेत आहेत.