Shiroli Crime | शिरोली तरुणी शोषण प्रकरण: शाहीद सनदे आणि शाहरुख देसाईच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ
शिरोली प्रकरणात आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
कोल्हापूर -पुलाची शिरोली येथील तरुणींचे शोषण करून मोबाइलमध्ये चित्रीकरण करणारे संशयित शाहीद समीर सनदे, शाहरुख हुसेन देसाई (दोघे रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ झाली. हातकणंगले पोलिसांनी त्यांना सोमवारी (दि. ४) पेठ वडगाव न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी याप्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी प्रमुख धीरजकुमार बच्चू यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला. तसेच गुन्ह्यातील सबळ पुरावे गोळा करण्याच्या सूचना दिल्या.
फोटो, पोलिसांनी आरोपींकडून त्यांच्या मोबाइलमधील व्हिडिओ, मेसेज प्राप्त करायचे आहेत. तसेच या गुन्ह्यात त्यांचे इतर साथीदार आहेत काय? याची माहिती घ्यायची आहे. त्यामुळे पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे पोलिसांनीकेली. त्यावर न्यायाधीशांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत आठ मे पर्यंत वाढ केली. जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्याकडून दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अधीक्षकांकडून आढावा
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी एसआयटी प्रमुख अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला. गुन्हा घडलेले लॉज आणि कॅफेचे पंचनामे केले. गेल्या चार दिवसांत आरोपींचे कॉल डिटेल्स तपासले असून, त्यांच्या घरझडतीमधूनही काही वस्तू मिळाल्या आहेत. दोन्ही आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत. फॉरेन्सिकचे पथक आणि सायबर पोलिसांच्या मदतीने व्हिडिओ प्राप्त करण्याचे काम सुरू असल्याची माहिती एसआयटी प्रमुखांनी दिली. आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी ठोस पुरावे गोळा करण्याच्या सूचना अधीक्षकांनी एसआयटी प्रमुखांना दिल्या.