लईराईच्या जयघोषाने भारले शिरगाव
अखंड भक्तीभावासह उत्साहात जत्रोत्सवाला प्रारंभ : देवीची उत्सवमूर्ती मूळ आदिस्थानाकडे रवाना
डिचोली : पारंपरिक प्रथा व प्रशासकीय पातळीवरील कडक सुरक्षा व्यवस्था अशा स्वरूपात यावेळी साजऱ्या होणाऱ्या शिरगावातील श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला. सकाळी देवीच्या मंदिरात विविध धार्मिक विधी करण्यात आले. देवीच्या कळसातील तीर्थ गावातील प्रत्येक घरामध्ये वितरित करून गाव सुचिर्भूत करण्यात आले. तीर्थातील मोगऱ्याचा दरवळ गावात पसरला होता. मयेतील चौगुले मानकऱ्यांकडून देवीला मयेच्या भाऊ, बहिणींचा कवळास शिरगावात आणण्यात आल्यानंतर शिरगावात एकच चैतन्य संचारले. शिरगावातील देवीच्या मंदिरासमोरील सभामंडपात ढोलावर काठी बसताच ‘हर्रो हर्रो’चा गजर सुरू झाला. हातातील वेतकाठी हवेत फिरवत धोंडगण सभामंडपात थिरकू लागले आणि देवी लईराईच्या नामघोषाने सारा परिसर दणाणून गेला. दुपारी 12 वा. च्या सुमारास मुख्य मंदिरातून देवीची ‘चिरा’ म्हणजेच उत्सवमूर्ती वाजत गाजत बाहेर काढण्यात आल्यानंतर शिरगावातील रस्त्यावर धोंडगणांसह देवीनेही नाचतच आपल्या मुड्डी येथील मूळ आदिस्थानाकडे प्रस्थान केले.
सकाळपासून हजारोंच्या संख्येने धोंडगणांनी उपस्थिती लावली होती. अन्य भाविकांचीही दर्शनासाठी मोठी उपस्थिती होती. रात्री भव्य होमकुंड प्रज्वलित केल्यानंतर पहाटे देवी अग्निदिव्य करून आपला ‘पण’ पूर्ण करणार आहे. या जत्रोत्सवाची उत्सुकता सदैव सर्वांनाच असते. गेल्यावर्षीच्या कटू आठवणी मनाच साठवून यावर्षी पुन्हा नव्या जोमाने सर्व धोंडगणांनी आपल्या सोवळे व्रताला न्याय दिला. पाच व तीन दिवसांचे सोवळे व्रत पाळल्यानंतर सर्व धोंडगण जत्रोत्सवासाठी सज्ज झाले. सकाळपासून मोठ्या संख्येने धोंडगणांनी शिरगावात उपस्थिती लावून देवीचे दर्शन घेतले. पवित्र तळीवर स्नान करून मुड्डी येथेही वारूळरूपी देवीचे दर्शन घेतले. असह्य उकाड्याचे चटके अंगावर सोसत मोठ्या संख्येने महिला, वृद्ध, तरुण याचबरोबर धोंडगणांनी जत्रोत्सवात उपस्थिती लावली.
देवीला अर्पण केले मोगरीचे कळे
जत्रोत्सवात देवी लईराईला प्रिय असलेल्या मोगरीच्या कळ्यांच्या माळा हातात घेऊन भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यावर्षी विक्रेत्यांना दुकाने किंवा गाळे थाटण्यास मज्जाव केल्याने मंदिराच्या सभोवताली मोगरी विक्री करणाऱ्या फुलविक्रेत्यांनाही हटविण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी मोगरीचे कळे विकणाऱ्या फुलविक्रेत्यांची गैरसोय झाली. रस्त्याच्या बाजूला राहून या विक्रेत्यांना मोगरीचे कळे व फुलांची विक्री करावी लागली. जत्रोत्सवात मोगरीच्या कळ्dयांना मोठी मागणी असल्याने माळांच्या दरांमध्ये बरीच वाढ झाली होती. तरीही लोक व धोंडगण देवीच्या श्रद्धेपोटी चढ्या दरानेही मोगरीच्या कळ्यांच्या माळा खरेदी करून देवीला अर्पण करीत होते.
मयेतील कवळास शिरगावात दाखल
देवी लईराईला मये गावातून कवळास आल्यानंतर जत्रोत्सवाला प्रारंभ होतो. सकाळी साडेअकराच्या सुमारास मये व वायंगिणीतील चौगुले मानकरी गावकरवाडा मये येथील देवी महामायाच्या मंदिरात जमा झाले. मंदिरात देवीला सांगणे घातल्यानंतर देवीचा कवळास घेऊन चौगुले मानकरी शिरगाव येथे जाण्यास निघाले. दु. 12 वा. च्या सुमारास मयेतील चौगुले मानकरी शिरगावातील मंदिरात दाखल झाले.
देवीची उत्सवमूर्ती मुड्डीस रवाना
मयेतील चौगुले मानकरी शिरगाव मंदिरात दाखल होताच सर्वत्र विखुरलेले धोंडगण मंदिराच्या मंडपात जमा झाले. येथे ढोलावर काठी पडताच हर्रो... हर्रो... च्या गजरात हातातील वेतकाठी हवेत फिरवत धोंडगणांनी वेतनृत्याला प्रारंभ केला. याचवेळी शिरगाव येथील देवीचे चौगुले मानकरी यांनी देवीची उत्सवमूर्ती (चिरा) असलेली पेठ मंदिरात आणली. उत्सवमूर्ती सजविण्यात आल्यानंतर चिरा मोडाच्या डोक्यावर स्वार करण्यात आली. देवीला गाऱ्हाणे घालताच वाजत गाजत धोंडगणांच्या साथीने नाचत चिरा मुड्डी येथे जाण्यासाठी रवाना झाली. वाटेत असंख्य भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.

मानवून घेतले नवीन धोंडगणांना
चिरा मुड्डी येथे आपल्या आदिस्थानात दाखल झाल्यानंतर देवीचा मोठा जयघोष झाला. यानंतर सर्व धोंडगणांनी देवीच्या पवित्र तळीवर स्नान केले. येथे स्नान केल्यानंतर मुड्डी येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच होमकुंडाला प्रदक्षिणा घातल्या. मुड्डी येथे नव्यानेच धोंड म्हणून रूजू झालेल्या धोंडगणांना मानवून घेण्यात आले. सकाळपासूनच राज्यातील विविध भागांमध्ये सोवळे व्रत पाळलेल्या असंख्य धोंडगणांनी शिरगावात उपस्थिती लावली होती.
रात्री चिरा पूर्ववत मंदिरात दाखल
दुपारी वाजत गाजत आपल्या मूळ आदिस्थानात आणण्यात आलेली चिरा देवीची उत्सवमूर्ती रात्री 8.30 वा. च्या सुमारास मोडाच्या डोक्यावर स्वार करून नाचत, गाजत देवीच्या मुख्य मंदिरात आणण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. रात्री 11.30 वा. च्या सुमारास देवीचा मोगरीच्या कळ्यांनी सजविलेला कळस मोडपुरूषांच्या डोक्यावर स्वार करण्यात आला. जत्रोत्सवाचे गाऱ्हाणे घातल्यानंतर असंख्य धोंडगणांच्या वेतनृत्य आणि देवीच्या जयघोषात नाचत, गाजत मंदिरातून बाहेर काढण्यात आला. रात्री 12 वा. च्या सुमारास देवीचा कळस नाचत गाजत होमकुंडस्थळी दाखल होताच देवीच्या नामाचा मोठा गजर करण्यात आला. अगदी वातावरण प्रफुल्लित झाले होते. होमकुंडाला देवीने चंद्रज्योतीच्या सहाय्याने अग्नी दिला. व होमकुंड हळू हळू पेट घेऊ लागले. होमकुंड पूर्णपणे पेट घेताच हा सारा परिसर अगदी अधिकच प्रकाशमान झाला.
होमकुंडाला अग्नी दिल्यानंतर लगेच देवी पवित्र तळीवर स्नानासाठी गेली. पवित्र तळीवर गेल्यानंतर देवीच्या कळसात तीन ओंजळी तळीतील पाणी घालण्यात आले. समवेत असलेल्या मोडपुरूष व इतर चौगुले मानक्रयांनी स्नान केल्यानंतर कळस मुड्डी येथे मूळ आदिस्थानात गेला. देवीचा कळस मुड्डी येथे दाखल होऊन मंदिरात स्नानापन्न होताच शिरगावात दाखल झालेल्या लाखोंच्या संख्येने धोंडगणांनी पवित्र तळीत स्नान केले. पहाटे सर्व धोंडगणांनी होमकुंड अग्निदिव्य पार केल्यानंतर देवीचे चौगुले मानकरी होमकुंड पार करणार आणि त्यानंतर पहाटे देवीचा कळस धगधगत्या निखाऱ्यांवरून चालत जाऊन होमकुंड अग्निदिव्य पार करणार आणि आपल्या भावंडांसमोर केलेला पण पूर्ण करणार आहे. हा अपूर्व आणि सुवर्णमयी असा सोहळा पाहण्यासाठी शिरगावात मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती लाभणार आहे. या पणाच्या पूर्ततेची उत्सुकता मोठी असते.
पुढील चार दिवस कौलोत्सव चालणार
देवीने अग्निदिव्य पार केल्यानंतर कळस चव्हाटा येथे नेऊन ठेवला जाणार. तेथे लोक देवीच्या कळसाचे दर्शन घेतात. संध्याकाळी देवीचा कळस थेट मानसवाडा येथे नेण्यात येईल. तेथून देवीच्या कौलोत्सवाला प्रारंभ होणार आहे. शिरगावातील प्रत्येक घरांच्या अंगणात जाऊन देवी भाविकांना भेटी देणार आणि सेवा करून घेणार. प्रत्येक घरांमध्ये उपस्थित भाविक लोकांना देवी कौल देणार आहे. जत्रोत्सवानंतर बुध. दि. 22 एप्रिल ते शनि. दि. 25 एप्रिल असे चार दिवस कौलोत्सव चालणार आहे. शनिवारी रात्री विधीवतपणे देवीचा कळस मंदिरात दाखल झाल्यानंतर या पाच दिवशीय उत्सवाची सांगता होणार आहे. गेल्यावर्षीच्या घटनेनंतर शिरगावातील या जत्रोत्सवात प्रशासकीय पातळीवरून खबरदारीची मोठी उपाययोजना आखण्यात आली आहे.
त्यानुसार जत्रोत्सवात शिरगावातील मुड्डी ते मुख्य मंदिरापर्यंत रस्त्यावर दुकाने थाटण्यास मज्जाव असल्याने रस्ते पूर्णपणे खुले ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर भाविकांना व धोंडिणांना मुक्तपणे संचार करायला मिळत आहे. यावर्षी मंदिरातील दर्शनासाठी होणारी गर्दी विभागून सर्वांनाच सुरळीतपणे देवीचे मंदिरात दर्शन घेता यावे यासाठी मंदिरामागे खास भाविकांसाठी करण्यात आलेल्या क्यू मेनेजरमुळे भाविकांना सुरळीतपणे मंदिरात जाऊन दर्शन घेता आले. तसेच धोंडगणांसाठी वेगळी रांग व व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे गर्दी झाली नाही व कोणालाही दर्शन घेताना अडचण आली नाही. या व्यवस्थेचे भाविकांनी व धोंडगणांनीही कौतुक केले. सर्वत्र पोलीस बंदोबस्त कडकपणे ठेवण्यात आला आहे. होमकुंडस्थळी साकारलेल्या नियंत्रण व सूचना कक्षातून सर्व जत्रोत्सवावर बारकाईने लक्ष ठेवले जात होते.
एका बाजूला डोंगराच्या कडेला लागून थंड पेय, पाणी, अल्पोपहार यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. त्याचबरोबर ठरल्याप्रमाणे मंदिराच्या मागील बाजूस पार्किंगच्या जागेत दुकाने थाटण्यात आली आहे. यावर्षी दुकानांची संख्या कमी असल्याने लोकांना आवश्यक त्या स्वरूपात पाणी, थंड पेय व इतर गोष्टी मिळणे कठीण होण्याची शक्यता आहे. असह्य उकाड्यात लोकांचे पाण्याविना हाल होऊ नये यासाठी शिरगावातील स्थानिकांनी आपल्या घराबाहेर पाण्याची सोय लोकांसाठी केली आहे. त्याचबरोबर पोलीस, आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही मोठ्या प्रमाणात भाविक व धोंडगणांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. शिरगावातील या जत्रोत्सवात बाहेरील दुकानांना मज्जाव करण्यात आला होता. परंतु संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन डिचोली उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी ही पारंपरिक दुकाने खोलण्याचा आदेश जारी केल्याने ही दुकाने खुली करण्यात आली. त्यामुळे या दुकानदारांनी समाधान व्यक्त केले.