शिराळ्यात भीषण अपघात; दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू, कारचालक फरार
देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण यमगर आणि नंदिनी सदगर हे मूळचे बीड जिल्ह्यातील हाटकरवाडी, ता. शिरूर कासार येथील रहिवासी होते. सध्या ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साखराळे येथे वास्तव्यास होते. त्यांचे कुटुंब राजारामबापू सहकारी साखर कारखान्याकडे ऊसतोड मजूर म्हणून कामासाठी आले होते.
प्रवीण हा मोटारसायकलवरून नंदिनीला सोबत घेऊन शिराळा येथे देवदर्शनासाठी आला होता. देवदर्शन आटोपल्यानंतर दोघेही पेट्रोल भरण्यासाठी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास शिराळा हद्दीतील पेट्रोल पंपाकडे जात होते.
भरधाव कारची दुचाकीला मागून धडक
यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या मारुती सुझुकी सेलेरिओ कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील नंदिनी कारच्या बोनेटवर आदळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रवीण हा रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेत दोघांनाही उपचारासाठी कोयना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, नंदिनीचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर प्रवीणचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कारचालक वाहन सोडून फरार
अपघात घडल्यानंतर संबंधित कारचालक वाहन घटनास्थळीच सोडून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, फरार कारचालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.