स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे शिरखळ-चिंचाळी सरपंच ‘विशेष अतिथी’
दापोली / मनोज पवार :
तालुक्यातील शिरखळ-चिंचाळीचे सरपंच सुरज संतोष चव्हाण यांना 15 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे निमंत्रण आले आहे. तालुक्याला मिळालेला हा पहिलाच बहुमान आहे. कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातून केवळ सुरज चव्हाण यांना हे निमंत्रण आल्यामुळे दापोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या सोहळ्यादरम्यान त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी प्राप्त होणार आहे.
तालुक्यातील शिरखळ-चिंचाळी ग्रुप ग्रामपंचायतीचे सुरज चव्हाण सरपंच आहेत. सिव्हिल इंजिनियर असलेले चव्हाण या पदावर 2 वर्षे कार्यरत आहेत. तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक संतोष चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत. सुरज चव्हाण यांनी सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर गावामध्ये अनेक विकासकामे केली. यामध्ये रस्ते, पाणी, पथदीप, घरकुले यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना 15 ऑगस्ट रोजीच्या दिल्लीतील सोहळ्याचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. ते आपल्या पत्नीसह दिल्लीला रवाना होणार आहेत.
15 ऑगस्ट रोजी राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या स्वातंत्र्यदिन समारंभास राज्यातील 15 ग्रामपंचायतीच्या सरपंचांना विशेष अतिथी म्हणून
आमंत्रित करण्यात आले आहे. पंचायत राज्य प्रणालीचा गौरव करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या पंचायत राज, संरक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहभागातून राज्यातील माढा तालुक्यातील लोंढेवाडी (जि. सोलापूर), खासाननाका (जिनागपूर), कोरेगाव भीमा (पुणे), म्हातोडी (अकोला), मानस (ठाणे), दोरखडा (वाशिम, कोंढाला (गडचिरोली), खर्डा (अहिल्यानगर), भाजेपर (गोंदिया), केसलवाडा (भंडारा), चिंचाळी (रत्नागिरी), कुंभारी (परभणी), बिदाल (सातारा), कसवेगव्हाण (अमरावती), बामणी (लातूर) या पंधरा ग्रामपंचायतींच्या सरपंचांना यंदाच्या कर्तव्यपथ येथे होणाऱ्या स्वातंत्र्यदिन समारंभास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
- हा संपूर्ण कोकणाचा सन्मान
या संदर्भात सरपंच सुरज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला स्वातंत्र्यदिन समारंभास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे मिळालेले आमंत्रण हा माझ्या गावासह संपूर्ण कोकणाचा सन्मान असल्याचे सांगितले. दिल्लीला आपण स्वातंत्र्यदिनी उपस्थित राहणार, हा आपला वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण कोकणाच्यावतीने तेथे उपस्थित राहणार असल्याने आपल्यावर भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची जबाबदारी आल्याचे ते म्हणाले. शिवाय आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट मिळणार असल्याने आपल्या आयुष्यातील हा सर्वोच्च क्षण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना दिली.