बाली बेटाजवळ जहाजाला जलसमाधी
5 जणांचा मृत्यू, 29 जणांचा बचाव : 31 प्रवासी बेपत्ता, नऊ बोटी बचावकार्यात सहभागी
वृत्तसंस्था/बाली
इंडोनेशियातील बाली रिसॉर्ट बेटाजवळ गुरुवारी 65 जणांना घेऊन जाणारे प्रवासी जहाज बुडाले. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 29 जणांना वाचवण्यात आले. तर 31 जण अजूनही बेपत्ता आहेत. केएमपी तुनु प्रतामा जया नावाचे हे जहाज पूर्व जावामधील केतापांग बंदरावरून बालीतील गिलिमानुक बंदराकडे प्रवास करत असताना बुडाले. प्रवास सुरू झाल्यानंतर सुमारे 30 मिनिटांनी त्याला जलसमाधी मिळाली. याप्रसंगी जहाजात सुमारे 53 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 65 जण होते. तसेच काही ट्रकसह 22 वाहनेही सदर जहाजात होती. स्थानिक पोलीस आणि तपास संस्था जहाज बुडण्याच्या कारणांचा तपास करत आहेत. स्थानिक वेळेनुसार रात्री 11:20 वाजता जहाज बुडाले. विविध जहाजांसह नऊ बचाव बोटींच्या माध्यमातून बेपत्ता लोकांचा सक्रियपणे शोध घेतला जात आहे. दोन मीटर उंचीच्या लाटांमुळे बचाव पथकांना लोकांना शोधण्यात अडचणी येत आहेत. तथापि, सर्व बेपत्ता लोक सापडेपर्यंत प्रयत्न सुरू राहतील, असे राष्ट्रीय शोध आणि बचाव एजन्सीने स्पष्ट केले आहे.