Accident News: नेसरीजवळील अपघातात युवक जागीच ठार, राज्यमार्गावरील दुसरा अपघात
राज्य मार्गावरील शिप्पूर तर्फ नेसरीनजीक दोन आठवड्यातील दुसरा अपघात
नेसरी : शिप्पूर तर्फे नेसरीजवळ अपघातात तरुण जागीच ठार झाला. प्रेम संतोष यमेटकर (वय 16, रा. हडलगे, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. रोहित मंडाळे (वय 18, माणगाववाडी, ता. चंदगड) हा तरुण जखमी झाला असून त्याला गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याप्रकरणी अनंत मटकर (रा. शिप्पूर तर्फ नेसरी) याच्या विरोधात शंकर धोंडिबा चिगरे (वय 35, रा. माणगाववाडी, ता. चंदगड) यांच्या फिर्यादीवरून नेसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, प्रेम यमेटकर व रोहित मंडाळे हे दुचाकीवरून गडहिंग्लजवरून हडलगे गावी निघाले होते. यावेळी समोरुन येणाऱ्या चारचाकीने शिप्पूर तर्फ नेसरीजवळ त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. यात प्रेम जागीच ठार झाला तर रोहित जखमी अवस्थेत पडला होता.
त्याला नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला गडहिंग्लजला नेण्यात आले. अपघाताची माहिती समजताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी व नेसरी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. रात्री उशिरा प्रेम याचा मृतदेह विच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अवघडे करत आहेत.
दोन आठवड्यातील दुसरा अपघात
गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील शिप्पूर तर्फ नेसरीनजीक दोन आठवड्यातील हा दुसरा अपघात आहे. सत्तेवाडी येथील युवती गेल्या आठवड्यात अपघातात जागीच ठार झाली होती. तर शनिवारी झालेल्या या अपघातात हा तरुण जागीच ठार होण्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत होती.