शिंजो आबे यांच्या मारेकऱ्याला जन्मठेप
जपानचे माजी पंतप्रधान : हत्येनंतर साडेतीन वर्षांनी निवाडा
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या व्यक्तीला बुधवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 8 जुलै 2022 रोजी नारा शहरात निवडणूक प्रचारादरम्यान शिंजो आबे यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. आरोपी तेत्सुया यामागामी यांनी केलेला गुन्हा अत्यंत गंभीर होता आणि त्यांना कठोर शिक्षेची आवश्यकता होती, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.
आरोपीचा सुरुवातीला चर्च अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा हेतू होता. परंतु 2021 मध्ये त्याने शिंजो आबेंचा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर आबे यांचे त्या चर्चशी संबंध दिसून आल्याने आपण आबे यांनाच लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला, असे यामागामीने न्यायालयात कबूल केले होते.
हत्येच्या दिवशी शिंजो आबे नारा शहरात निवडणूक प्रचारादरम्यान भाषण देत असताना मागून गोळीबार करण्यात आला होता. डोक्याच्या मागील भागास गोळ्या लागल्याने आबे व्यासपीठावरच कोसळले होते. त्यांना ताबडतोब हेलिकॉप्टरने नारा मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी जवळजवळ सहा तास त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. एक गोळी आबे यांच्या हृदयात घुसली होती, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकातील एका डॉक्टरने सांगितले होते.