सरकारी शाळा विलीनीकरणाला शिंदोळी ग्रामस्थांचा विरोध
कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद करू देणार नसल्याचा नागरिकांचा इशारा
बेळगाव : शिंदोळी सरकारी शाळा बंद करण्याच्या विरोधात ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला आहे. सोमवारी एआयडीएसओ आणि सेव्ह पब्लिक एज्युकेशन यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी केपीएस मॅग्नेट योजनेंतर्गत शिंदोळी सरकारी शाळा बंद करून तिचे मास्तमर्डी सरकारी शाळेत विलीनीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. गावातील शाळेसमोर आंदोलन करत कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद करू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावेळी बोलताना शाळेचे पालक रामा नागण्णावर म्हणाले, आम्ही काम करून कुटुंबाचा उदयनिर्वाह करतो. सकाळी लवकर उठून कामावर जावे लागत असल्याने शाळा गावात असणे गरजेचे आहे. गावातील शाळा बंद झाल्यास मुलांना इतर गावांमध्ये पाठविताना मुलांच्या सुरक्षेबाबत कोण जबाबदारी घेणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सरकारच्या या निर्णयामुळे गरिबांना शिक्षण घेणे अवघड होईल
लक्ष्मी कारेगार यांनी मुलींवरील होणारे हिंसाचार, अत्याचार हे पाहता मुलींना दुसऱ्या गावात शिक्षणासाठी पाठवू शकत नाही, असे स्पष्ट केले. शाळा बंद करण्याच्या सरकारच्या या निर्णयामुळे गरिबांना शिक्षण घेणे अवघड होईल, असे एआयडीएसओचे जिल्हा समन्वयक महांतेश बिलूर यांनी सांगितले. यावेळी निलजी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सतीश शहापूरकर यांना निवेदन देण्यात आले. त्यांनीही आपण केपीएस मॅग्नेट स्कूलच्या विरोधात असल्याचे सांगितले. आंदोलनावेळी शांता टिप्पणगोळ, भरमव्वा शहापूरकर, लक्ष्मी शहापूरकर, बल्लव्वा अक्षीमनी, भावकाण्णा कणबरकर यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.