Eknath Shinde On Uddhav Thackeray | 'आंदोलनांना फक्त पाठिंबा देतात'... उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंची टीका
दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाठिंबा दिल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली.
शिंदे म्हणाले की, आंदोलनांना बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा जुना पायंडा असून प्रत्यक्ष सहभागापेक्षा केवळ समर्थनाची भूमिका ते घेत असतात. सरकारविरोधात कोणतेही आंदोलन उभे राहिले की त्यामागे उभे राहण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय, देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय पक्ष स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शिंदे यांनी केला. राज्यात आणि देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काहींकडून होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमधील परिस्थितीची तुलना भारताशी करणे चुकीचे असल्याचे सांगत, त्या देशांमध्ये आर्थिक संकटामुळे जनतेला रस्त्यावर उतरावे लागले होते, तर भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गती कायम असल्याचा दावा शिंदे यांनी केला. केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे मोठ्या संख्येने नागरिक दारिद्र्यरेषेच्या वर आले असून देशाची अर्थव्यवस्था सक्षमपणे पुढे जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.