For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोकणातील शिमगोत्सव..!

06:23 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोकणातील शिमगोत्सव
Advertisement

कोकणातील शिमगोत्सव म्हणजे केवळ एक सण नसून तो लोककला, संस्कृती आणि श्रद्धेचा एक मोठा उत्सव आहे. होळी किंवा हुताशनी पौर्णिमा या सणाला शिमगा म्हणतात. हा सण फाल्गून शुद्ध पौर्णिमेपासून सुरू होतो आणि पुढील पाच ते 15 दिवसांपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमग्याचे मुख्य वैशिष्ट्या म्हणजे ग्रामदेवतांची पालखी. देव स्वत: भक्तांच्या भेटीला त्यांच्या घरी येतात. अनेक गावात पालखी खांद्यावर घेऊन ढोल-ताशांच्या गजरात नाचविण्याची परंपरा आहे. गणेशोत्सवानंतर शिमगोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 2 मार्चपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. पुढील 15 दिवस शिमगोत्सवाचा उत्साह कोकणात पाहायला मिळणार आहे.

Advertisement

कोकणचे निसर्गसौंदर्य जितके मन मोहून टाकणारे आहे, तितकेच येथील लोकसंस्कृतीत परंपरागत समृद्ध आणि विशाल आहे. कोकणी माणूस पिढ्यानपिढ्या आपल्या प्रथा, परंपरा आणि श्रद्धा जपत आला असून निसर्गाशी व देवदेवतांशी असलेले त्यांचे नाते आजही तितकेच घट्ट आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात अनेक लोकसंस्कृतींवर परिणाम झाला असला, तरी कोकणातील लोकसंस्कृतीने मात्र आपले मूळ स्वरुप टिकवून ठेवले आहे. त्यापैकी रोंबाट आणि राधा नृत्य यासारखी लोककला शिमगोत्सवाच्या माध्यमातून टिकवून ठेवण्यात आलेली आहे.

फाल्गून पौर्णिमेनंतर वसंतोत्सवाला अर्थात वसंत ऋतूला सुऊवात होते. या ऋतूला वेगळा आनंदोत्सव रंग होळीमुळे आहे. यंदा 2026 मध्ये 2 मार्च रोजी होळी उत्सव सुरू झाला असून, 3 मार्च रोजी धुलीवंदन झाले, तरी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावातील रुढी, परंपरा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कुणी दुसऱ्या दिवशी, तर कुणी पाच, सात, नऊ, पंधरा आणि काही ठिकाणी, तर एक महिन्यांतर रंगपंचमी साजरी करत असतात. कोकणात त्याला ‘धुळवड’ असे म्हटले जाते.

Advertisement

होळी सण उत्तर भारतात सुद्धा साजरा केला जातो. परंतु कोकणातील होळी उत्सवाला फार महत्व आहे आणि मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे देशभर कोकणातील शिमगोत्सवाबद्दल मोठे आकर्षण आहे. या सणाला ‘होळी पौर्णिमा’ असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धुलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धुळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवर आपापल्या पद्धतीने नावं ठेवून विभागणी होते. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण साजरा करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे आणि कोकणातील शिमगोत्सव थोडा वेगळा आहे. मात्र, महाराष्ट्रामध्ये कोकणात सर्वाधिक मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा केला जातो. म्हणूनच या उत्सव कालावधीत कामानिमित्त बाहेरगावी गेलेले कोकणातील लोक शिमगोत्सवासाठी आवर्जून आपापल्या गावी येतात आणि शिमगोत्सव साजरा करत असतात.

होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते. कोकणपट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. बाकी ठिकाणी ज्या सणाला होळी म्हणतात, त्या होळी सणाला कोकणात ‘शिमगा’ म्हणतात. गावागावातून ढोल-ताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्षे ठरविलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात, असं कोकणात मानलं जातं. ग्रामदेवता घरात येणार, याचा घरोघरी आनंद काही औरच असतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचविणं हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो.

कोकणात होळीचा उत्सव महत्वाचा मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा शिमगोत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात हा सण सुमारे 15 ते 30 दिवस साजरा केला जातो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमेनंतर प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम’ असे म्हणतात.

कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव शिमगोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी होडीवर जायचा मान घरातील स्त्रियांना दिला जातो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कोळी बांधव होडीवर जातात. पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सव यावेळी साजरा केला जातो.

शिमग्याचे वेगवेगळे खेळ कोकणात पाहायला मिळतात. ही जुनी परंपरा आजही जपली जाते. यात आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगोत्सवात भरविल्या जातात. होळीच्या दिवसात ‘जती’च्या रुपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धुलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजच्या काळातही सुरू आहे. शिमगा उत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते. वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुऊषमंडळींनी स्त्राr वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यासारखी सोंगे, असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. लोकनृत्याला गीताची व वाद्यवादनाची पूरक साथ असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात.

शिमगोत्सव म्हटला, की कोकणातील प्रत्येक घरी आनंदाला उधाण आलेले असते. ज्या दिवशी होळी सणाला सुरुवात होते, त्यादिवशी होळीचा सण म्हणून घरोघरी पुरणपोळ्या किंवा शिरवाळे हे होळी सणातील पक्वान्न प्रत्येकाच्या घरी पाहायला मिळते आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोक येत असतात. प्रत्येक गावात होळी उत्सव साजरा करत असताना वाड्यावाड्यांमध्ये मांड भरवला जातो आणि दरदिवशी त्याठिकाणी खेळे केले जातात. त्याला कोकणात रोंबाट मारणे असे म्हटले जाते. त्याचबरोबर रोंबाट मारण्यासाठी नाच्या हा प्रकार असतो. घरोघरी जाऊन रोंबाट मारले जाते आणि अशावेळी खास नाच पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सूकता असते व गर्दीही गेली जाते. या शिमगोत्सवात अनेक वर्षांपासून शबय मागण्याची परंपराही जपली जाते. शबय मागणे किंवा रोंबाट मारणे याबाबत या पूर्वीच्या काळात त्याला फारसी प्रसिद्धी नव्हती. परंतु आता शिमगोत्सवाला  मोठी प्रसिद्धी मिळत असल्याने गावाकडील लोकांबरोबरच शहरात राहणारे लोकही शिमगोत्सवात खास करून सहभाग घेत असतात.

कोकणातील शिमगोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे, ज्यावेळी वाडीवाडींमध्ये मांडावर खेळे करण्याचा जो प्रकार असतो, त्यावेळी ‘घुमाट’ हे वाद्य एका विशिष्ट प्रकारे वाजविले जाते. त्यामुळे या घुमटाचा आवाज आणि ते पाहणे ही उत्सूकतेचे असते. त्याबरोबरच ढोल, ताशे, झांज ही वाद्येही नेहमी पेक्षा वेगळ्या पद्धतीने शिमगोत्सवावेळी वाजविली जातात. कोकणात शिमगोत्सवाच्या रुढी, परंपरा जपत असताना काही गावांमध्ये शिमगोत्सवाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि या पद्धतीतून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यात सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील नेरुर येथे प्रसिद्ध मांड उत्सव पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी असते. पुराण कथांवर आधारित आकर्षक व चित्तथरारक चित्ररथ देखावे ढोल-ताशांचा ठेका धरत त्यात नाचणारी सोंगे हे सारे नेत्र सुखद असते.

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.