शिगेरू इशिबा जपानचे नवे पंतप्रधान
केवळ तीन वर्षांमध्ये बदलले तीन पंतप्रधान
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानच्या सत्तारुढ पक्षाने माजी संरक्षणमंत्री शिगेरू इशिबा यांना नेता म्हणून निवडले आहे. इशिबा हे पुढील आठवड्यात देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. शिगेरू स्वत:च्या कार्यालयात मॉडेल युद्धनौका आणि लढाऊ विमानाची प्रतिकृती ठेवण्यासाठी ओळखले जातात. माजी संरक्षण मंत्र्याला चीन आणि उत्तर कोरियाकडून उद्भवलेल्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी ‘आशियाई नाटो’च्या निर्माणाच्या प्रस्तावासाठी देखील ओळखले जाते.
शिगेरू इशिबा हे फुमियो किशिदा यांच्या पारंपरिक दृष्टकोनाच्या तुलनेत वेगळे नेते मानले जातात. इशिबा हे जपानने विदेश धोरण आणि संरक्षणाच्या क्षेत्रात अधिक स्वायत्त भूमिका पार पाडावी या मताचे आहेत.
कनिष्ठ सभागृहात एलडीपी मजबूत
देशाचे माजी संरक्षणमंत्री शिगेरू इशिबा हे जपानचे पुढील पंतप्रधान होणे निश्चित आहे. जपानमधील सत्तारुढ पक्ष लिबरल डेमोक्रेटिक पार्टी आणि देशाचे नेतृत्व करण्यासाठी इशिबा यांची शुक्रवारी निवड करण्यात आली. एलडीपीला संसदेच्या कनिष्ठ सभागृहात पूर्ण बहुमत प्राप्त आहे. जपानच्या लोकशाहीवादी व्यवस्थेत संसदेचे कनिष्ठ सभागृह अत्यंत शक्तिशाली असते.
साने ताकाइची यांच्यावर मात
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानात शिगेरू इशिबा यांनी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाइची यांच्यावर मात केली आहे. यावेळी देशाच्या पंतप्रधानपदी महिला नेत्याची निवड होऊ शकते असे मानले जात होते. याचबरोबर इशिबा यांच्यासमोर युवा नेते सर्फर शिंजिरो कोइजुमी यांचे आव्हान होते. इशिबा हे पंतप्रधानपदासाठी यंदा पाचव्यांदा आणि अखेरचा प्रयत्न करत होते. इशिबा यांच्या कार्यकाळात जपान आता स्वत:ची राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मानले जात आहे