अशोकनगर ईएसआय हॉस्पिटलचे यमनापूर कार्यालयात स्थलांतर
केवळ रेफर केंद्राची व्यवस्था : एक्स-रे, रक्त तपासणीसारख्या सुविधा मिळणार नाहीत
बेळगाव : अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटल यमनापूर येथील कार्यालयात हलविण्यात येणार आहे. परंतु त्या ठिकाणी केवळ रेफर केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून ईएसआय लाभार्थ्यांचीही गैरसोय होणार आहे. ईएसआय हॉस्पिटलसाठी शहरात एकही मोठी जागा मिळाली नाही का? असा प्रश्न आता लाभार्थ्यांमधून विचारण्यात येत आहे.
बेळगाव जिल्ह्यात तीन लाखाहून अधिक ईएसआय लाभार्थी आहेत. बेंगळूर शहरानंतर सर्वाधिक ईएसआय लाभार्थी हे बेळगाव जिल्ह्यात आहेत. शहरात अनेक ठिकाणी लहान डिस्पेन्सरी असून अशोकनगर येथे मुख्य हॉस्पिटल मागील अनेक वर्षांपासून होते. परंतु हॉस्पिटलमधील अनेक इमारती जीर्ण झाल्यामुळे या ठिकाणी नवीन हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मध्यंतरी उद्यमबाग परिसरात जागेचा शोध सुरू होता. परंतु निश्चित जागा मिळाली नव्हती.
योग्य जागा न मिळण्याचे कारण देत यमनापूर येथील ईएसआय डिस्पेन्सरीमध्ये हा दवाखाना हलविण्यात येणार आहे. परंतु नागरिकांना एक्स-रे, रक्त तपासणी यासारख्या कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत. उपचारांसाठी इतर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रेफर लेटर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे सध्या तपासणीसाठीही नागरिकांना मोठ्या हॉस्पिटलचे उंबरटे झिजवावे लागणार आहेत. या ठिकाणच्या कायमस्वरुपी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना दांडेली, हुबळी येथे बदली देण्यात आली आहे. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.
45 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड...
अशोकनगर येथील ईएसआय कार्यालयात नर्सिंग लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट यासह इतर पदांवर 45 हून अधिक कंत्राटी कर्मचारी कार्यरत होते. परंतु हॉस्पिटल बंद करण्यात येणार असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांना बेरोजगार व्हावे लागले आहे. कर्मचारी व नागरिकांचा विचार करता एखाद्या मोठ्या जागेत आहे तसे हॉस्पिटल स्थलांतर करणे गरजेचे असताना केवळ रेफर केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.