राजकारणातील छक्क्या-पंज्याने बदलती समीकरणे
प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो. मराठी माणूस म्हणजे स्वाभीमानी. गुजराती म्हणजे उद्यमी. खरे खोटे देव जाणे पण काश्मीरी माणूस म्हटला की बेभरवशाचा. त्या माणसावर फारसा विश्वास कोणी ठेवत नाही. बोलताना शंभर वेळा आणा-शपथा काश्मीरीने घेतली तरी तो कितपत खरे बोलतोय यावर शंका उपस्थित केली जाते. याचे भले-बुरे पडसाद राजकारणात देखील उमटताना दिसतात.
केंद्रशासित प्रदेश बनवल्या गेलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता असली तरी त्या पक्षातील सर्वेसर्वा फारूक अब्दुल्ला आणि त्यांचा मुख्यमंत्री मुलगा ओमर अब्दुल्ला यांना या विश्वासार्हतेच्या अभावाचा चटका बसू लागला आहे असे राजकारण घडत आहे. त्यांच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना फारसा विश्वास नसल्याने केंद्र त्यांना फारसे काहीही न देता वाटाण्याच्या अक्षता लावत असताना दिसते. जम्मू आणि काश्मीरला परत राज्याचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी राज्यातील सत्ताधारी आसुसलेले असले तरी केंद्र त्यांना फक्त खेळवत आहे. नॅशनल कॉन्फरन्स जर भाजपच्या राजकारणाला मदत करणारी असेल तरच तिचे काम होईल असा मोदी-शहा यांचा विचार असल्याने ‘आशा सुटेना आणि देव भेटेना’ असाच अनुभव अब्दुल्ला पिता-पुत्रांना येत आहे.
राहुल गांधी आणि ओमर यांची मैत्री असली तरी काँग्रेसने ओमर मंत्रिमंडळात सामील होण्याचे निमंत्रण नुकतेच फेटाळून मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळे असा संदेश दिलेला आहे. विरोधी पक्षांच्या ऐक्याला कमजोर करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री आधेमधे भाजपला अनुकूल वक्तव्ये करतात असा काँग्रेसींचा आरोप आहे. हे पितापुत्र दिवसेंदिवस अलोकप्रिय होत आहेत आणि राज्यात त्यांच्यापासून दूर राहणेच काँग्रेसच्या बऱ्याचे आहे असे राहुल यांच्या गोटात वाटत आहे. तात्पर्य काय अब्दुल्लांवर विश्वास ठेवायला कोणीही तयार नाही.
पंजाबमध्ये उलथापालथ होणार काय?
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे लवकरच काँग्रेसमध्ये परत प्रवेश करणार अशी हवा निर्माण झाल्याने राज्य काँग्रेस तसेच भाजपमधील बडे बडे नेते हवालदिल झालेले आहेत. अमरिंदर यांची भाजपमध्ये कुचंबणा होत आहे हे अलीकडे दिसले होते. त्या पक्षापेक्षा काँग्रेसमध्ये बरेच स्वातंत्र्य आहे अशा अर्थाची त्यांनी केलेली टीप्पणी राजकीय जाणकारांनी हेरली होती. अमरिंदर जर प्रत्यक्षात काँग्रेसमध्ये परतले तर त्याने राहुल गांधींच्या रणनीतीची बल्ले बल्ले होईल. कारण आजच्या घडीला अमरिंदर सिंग हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या येण्याने माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी या बंडखोर नेत्याची व त्याच्या साथीदारांची पंचाईत होईल. त्यांचे राजकारणच संपून जाईल. अशावेळी पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणूका जिंकून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला अजून एक धक्का दिला जाऊ शकतो.
जगन मोहन यांची तिरकी चाल?
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदींना 2029च्या लोकसभा निवडणूकीत देखील पंतप्रधानपदाचा दावेदार घोषित करून स्वत:ची खुर्ची बळकट करण्याचा खेळलेला डाव कितपत यशस्वी होणार याबाबत साशंकता असतानाच त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी वाय एस जगनमोहन रे•ाr यांनी एक नवीन शक्कल लढवली आहे. आपण आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यास तयार आहोत अशी आवई उठवून त्यांनी आंध्रच्या राजकारणात एक नवीन रंगत आणली आहे. प्रत्यक्षात असे घडो अथवा नाही, पण त्याने काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा भाव दक्षिणेत अजून वधारण्यास मदत केलेली आहे. दुसरे म्हणजे अगोदरच अडचणीत सापडलेल्या भाजपला त्यामुळे अजून एक धक्का बसलेला आहे. जगन मोहन यांची बहीण शर्मिला ही काँग्रेसमध्ये आली असली आणि तिला आंध्र काँग्रेसचा अध्यक्ष बनवले गेलेले असले तरी तिच्या नेतृत्वाखाली राज्यात पक्षाला बाळसे धरलेले नाही. जगन मोहन हे कितीही वादग्रस्त असले तरी नेता असल्याने ते जादूच्या कांडीप्रमाणे पक्षात चैतन्य आणू शकतात, असे त्यांचे समर्थक म्हणतात. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या भाजपने त्यांचा पक्ष तोडण्याचे जे कारस्थान केलेले आहे त्याला उतारा म्हणून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहेत. अशावेळीच दक्षिणेतून ही नवीन टूम सुरु झालेली आहे. पुढील लोकसभा निवडणूकीस अजून तीन वर्षाचा कालावधी असल्याने तोवर राजकारणातील बरीच समीकरणे बदलणार आहेत. राजकारण म्हणजे महासागर तिथे नेहमी लाटा उसळतातच. जर तो कधी फार शांत झाला तर ती कदाचित वादळापूर्वीची शांतता असते.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी आपला टी वी के हा पक्ष विरोधकांच्या इंडिया आघाडीपासून दूर ठेवून सध्यातरी भाजपाला चुचकारण्याचे काम केलेले आहे. लोकसभा निवडणूकीला अजून तीन वर्षे असल्यामुळे ‘थंडा करके खाओ’ अशी नीती त्यांनी बाळगलेली दिसत आहे. पुढील तीन वर्षे मोदी सरकारकडूनच राज्याची कामे करून घ्यायची आहेत, याची त्यांना जाणीव आहे. डिलिमिटेशनच्या वादग्रस्त मुद्यावर मात्र त्यांनी काँग्रेसची री ओढून केंद्राला एक प्रकारे इशाराच दिलेला आहे. तामिळनाडूमध्ये डिलिमिटेशन हा एक भावनिक मुद्दा आहे आणि जनभावनेशी जोडून विजय यांना एकाचवेळी आपली राजकीय पत वाढवायची आहे आणि राज्यातील विरोधकांना त्याबाबत आपल्या ओंजळीने पाणी पाजायचे आहे. राजकीयदृष्ट्या आपण नवखे खिलाडी नाहीत असेच विजय आपल्या एकानेक खेळीने दाखवत आहेत. नरेंद्र मोदी यांच्याहून राजकारण पुढे चालले आहे. वातावरण बदलत असले तरी हिंदुत्वाच्या राजकारणावरच भाजपचा अजूनही भर असल्याने त्याला वास्तवातील प्रश्नांची उकल करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे.
सुनील गाताडे