संडे मार्केटचे एपीएमसीमध्ये स्थलांतर करा
राज्य रयत संघटना, हासिरू सेनेची मागणी : अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन
बेळगाव : जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर एपीएमसीमध्ये भाजीपाल्याची खरेदी विक्री योग्यरित्या चालू आहे. मात्र भाजी मार्केटचे पदाधिकारी पुन्हा मार्केट सुरू करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून तोपर्यंत शहरातील कोणत्याही परिसरात भाजीपाला व्यवहारासाठी परवानगी देऊ नये. तसेच एपीएमसीमध्ये 29 नोव्हेंबरपर्यंत संडे मार्केट स्थलांतरित करण्याची मागणी राज्य रयत संघ व हासिरू सेनेच्यावतीने करण्यात आली.
राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्त्वाखाली प्रांताधिकारी श्रवण नायक यांना एपीएमसी आवारात निवेदन देण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते जय किसान भाजी मार्केट विरोधात लढा देत आहेत. तसेच मार्केटचा परवाना रद्द करण्यासाठी राज्य सरकार, कृषी विभाग, नगरविकास आदी संबंधित विभागांना निवेदने देण्यात आली आहेत. यानंतर कृषी विभागाकडून 15 सप्टेंबर रोजी जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्यात आला. यामुळे एपीएमसीमध्ये शेतकऱ्यांचे कायदेशीर व्यवहार सुरू असून त्यांना योग्य भावही मिळत आहे.
संडे मार्केटच्या नावाखाली काही व्यापारी शेतकऱ्यांकडून 8 ते 10 टक्के कमिशन घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचबरोबर वजनामध्येही शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. तसेच जय किसानचे व्यापारी पुन्हा व्यवहार सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र त्यांच्या मागणीला प्रशासनाने प्रतिसाद न देता शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष द्यावे. बेळगाव शहरात किंवा आसपासच्या परिसरात भाजीपाला खरेदी विक्रीसाठी कोणत्याही प्रकारचा परवाना न देता शेतकऱ्यांना एपीएमसीमध्येच मुक्तपणे व्यवहार करण्याची मुभा द्यावी.
संडे मार्केटचे पूर्णपणे एपीएमसीमध्येच स्थलांतर करण्यात यावे. जेणेकरून शेतकऱ्यांची लुबाडणूक होणार नाही. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होणार नसून शेतकऱ्यांना विनाअडचणी एपीएमसीमध्ये व्यवहार करता येणार आहे. एपीएमसीमध्ये व्यवहार सुरू झाल्यापासून सुमारे 10 लाख रुपयांचा महसूल राज्य शासनाला मिळाला आहे. याद्वारे एकप्रकारे राज्य शासनासह शेतकऱ्यांचाही लाभ होत असून शेतकऱ्यांना योग्य भावही मिळत आहे. यामुळे शेतकरीही आनंदी आहेत. यासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण संडे मार्केटचे एपीएमसीमध्ये स्थलांतर करण्यात यावे, अन्यथा एपीएमसीमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.