शेटफळ तलावात शनिवारी नीरा कालव्यातून पाणी; 10 गावांना मोठा दिलासा; चार महिन्यांची प्रतीक्षा संपली; शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार
इंदापूर (प्रतिनिधी) : गेल्या चार महिन्यांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेटफळ हवेली तलावात अखेर नीरा डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी (दि. 26) हे पाणी तलावात दाखल होणार असून, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील बावडा परिसरातील 10 गावांतील शेती तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली.
शेटफळ तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांसमोर पाण्याचे संकट निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे आणि कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांच्याशी तातडीने चर्चा करून तलावासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या शेटफळ तलावात केवळ 20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कालव्यातून पाणी दाखल झाल्यानंतर तलावातील पाणीसाठा 35 टक्क्यांपर्यंत पोहोचताच पुढील आवर्तन सोडण्यात येणार आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
या पाण्यामुळे शेटफळ, भोडणी, सुरवड, वकीलवस्ती, बावडा, पिठेवाडी, निरनिमगाव, कचरवाडी (बा.), सराटी आणि लाखेवाडी या दहा गावांतील शेती आणि विशेषतः चारा पिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटणार आहे.
तब्बल चार महिन्यांनंतर तलावात पाणी दाखल होणार असल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे आगामी काळात शेतीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.