For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

शेटफळमध्ये भरदिवसा 85 वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून सोन्याचे दागिने लंपास

03:10 PM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेटफळमध्ये भरदिवसा 85 वर्षीय वृद्धेला गंडा  दूध देण्याचे आमिष दाखवून सोन्याचे दागिने लंपास
Advertisement
पाटकुल | सुहास परदेशी : मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे एका 85 वर्षीय वृद्ध महिलेची दिशाभूल करून तिच्या अंगावरील सुमारे एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. दूध देण्याचे आमिष दाखवून महिलेला चारचाकी वाहनात बसविण्यात आले आणि त्यानंतर दमदाटी करून दागिने लंपास करण्यात आले. या प्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगुबाई रामचंद्र करंडे (वय 85, रा. शेटफळ, ता. मोहोळ) यांच्यासोबत 22 ऑक्टोबर रोजी दुपारी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगुबाई करंडे या दुपारी सुमारे 1.15 वाजता चहासाठी दूध आणण्याकरिता शेटफळ चौकातील किराणा दुकानाकडे जात होत्या. त्यावेळी पंढरपूर-कुर्डुवाडी मार्गावरील हॉटेल ओमसमोर पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी येऊन थांबली.

Advertisement

गाडीतील एका व्यक्तीने त्यांना कुठे जात असल्याची विचारणा केली. दूध आणण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर, संबंधित व्यक्तीने गाडीत बसल्यास दुधाची पिशवी देण्याचे आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून गंगुबाई गाडीत बसल्या.

दमदाटी करून दागिने काढून घेतले

Advertisement

गाडीत बसल्यानंतर संबंधित व्यक्तींनी गंगुबाई यांना दमदाटी केली. त्यानंतर त्यांच्या कानातील फुले, झुबे आणि गळ्यातील मणी असे सुमारे एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले. हा प्रकार दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास घडला. त्यानंतर संशयितांनी त्यांना रोपळे ते उपळाईदरम्यानच्या रस्त्यावर सोडून चारचाकी वाहनातून पलायन केले.

तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेनंतर गंगुबाई करंडे यांनी नातेवाइकांच्या मदतीने शेटफळ गाठले. त्यानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात जाऊन तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

भरदिवसा वृद्ध महिलेची दिशाभूल करून दागिने लंपास केल्याच्या या घटनेमुळे शेटफळ परिसरात चिंता व्यक्त होत आहे. अनोळखी व्यक्तींनी आमिष दाखवून वाहनात बसण्यास सांगितल्यास नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.