शेतकरी संघात सर्वपक्षीय पॅनेलची बाजी ! राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमदेवार विजयी
विरोधी नेसरीकर पॅनेलचा धुव्वा! सुमारे नऊ ते दहा हजाराचे मताधिक्य : कार्यकर्त्यांचा जल्लोष
कोल्हापूर प्रतिनिधी
शेतकरी सहकारी संघ निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेलने बाजी मारली. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित केलेल्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व 15 उमेदवार विजयी झाले. आघाडीच्या उमेदवारांनी सुमारे नऊ ते दहा हजाराचे मताधिक्य घेतले. दोन ते अडीच तासात मतमोजणी पूर्ण झाली. निकालाचे चित्र स्पष्ट होताच मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी गुलालाची आतषबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी काम पाहिले.
जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी सहकारी संघासाठी रविवारी मतदान झाले. संघासाठी एकूण 34 टक्के मतदान झाले. संस्था सभासद गटातील 37,755 सभासदांपैकी 12,851 सभासदांनी मतदानाचा हक्क बजाविला. व्यक्ती सभासद गटात 36,184 सभासदांपैकी 11,501 सभासदांनी मतदान केले. तर संस्था गटात 1571 सभासदांपैकी 1350 सभासदांनी मतदान केले होते. दरम्यान सोमवार 22 रोजी सकाळी आठ वाजता बहुउद्देशीय हॉल, रमणमळा येथे सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. 441 टेबलांवर सुमारे 225 कर्मचाऱ्यांकडुन मतदानाची मोजणी करण्यात आली. साधारणत: सकाळी साडेदहा वाजता मतमोजणी पूर्ण झाली.
निवडणुकीमध्ये सभासदांनी सर्वपक्षीय पॅनेलवर विश्वास दाखवला. व्यक्ती सभासद गटात 11,286 इतके मतदान झाले. यापैकी 215 मतदान अवैध ठरले तर 11,501 मतदान वैध ठरले. यामध्ये सर्वपक्षीय पॅनेलच्या उमेदवारांना सुमारे दहा हजारच्या आसपास मतदान मिळाले. तर नेसरीकर पॅनेलला 700 ते 1600 पर्यंत मतदान मिळाले. संस्था गटात 1350 मतदान झाले. यापैकी सर्वपक्षीय पॅनेलच्या उमेदवारांना 1266 ते 1281 पर्यंत मतदान मिळाले. महिला राखीव गटातही 12, 851 पैकी 11,216 मतदान सर्वपक्षीय पॅनेलला मिळाले. अनुसुचित जाती-जमाती गटामध्येही 12,495 मतदान झाले. यापैकी सर्वपक्षीय पॅनेलला 11,383 इतके मतदान झाले.
दोन उमेदवार बिनविरोध
सर्वपक्षीय राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे दोन उमेदवार यापुर्वीच बिनविरोध निवडूण आले होते. इतर मागास प्रवर्गातून सुनील मोदी तर भटके विमुक्त जमातीमधून राजसिंह शेळके बिनविरोध निवडूण आले होते.
संघ नाही वाचला तर सन्यास घ्या.
शेतकरी संघ वाचविण्यासाठी सर्व नेते एकत्र आले आहेत. त्यांनी संघ जर नाही वाचविला तर नेत्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असे रोखठोक मत एका सभासदाने चिठ्ठीद्वारे व्यक्त केले. मतपेटीत चिठ्ठ्या टाकत सभासदांनी त्यांचे मत व्यक्त केले. तसेच कार्यकर्ते नेत्यासाठी डोकी भडकवून घेतात आणि नेते स्वार्थासाठी एकत्र येतात, भष्ट्राचार करणाऱ्या कामगारांवर कडक कारवाई करा, आघाडीच्या नेत्यांनी संघास गतवैभव प्राप्त करुन द्यावे, अशा आशयाच्या अनेक चिठ्ठ्या मतपेटीतून मिळून आल्या.
विरोधी नेसरीकर पॅनलचा धुव्वा
सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत केलेल्या आघाडीला नेसरीकर पॅनेलने आव्हान देत पाच उमेदवार उभे केले. मात्र प्रचार यंत्रणे अभावी निवडणुकीत पॅनेलचा धुव्वा उडाला. नेसरीकर पॅनेलमधील व्यक्ती सभासद गटातील यशोधन शिंदे यांना सर्वाधिक 1618 मते मिळाली. तर मुकुंद पाटील यांनी 1309 मते मिळाली. अनुसुचित जाती-जमातीमधून सुभाष देसाई यांनी 948, महिला राखीव गटातून सुधा इंदूलकर यांना 1360 आणि जान्हवी रावराणे यांना 1368 मते मिळाली.
किरकोळ पोलीस बंदोबस्त
निवडणुक एकतर्फी होणार असल्याचे चित्र स्पष्ट असल्यामुळे मतमोजणी स्थळी इतर निवडणुकांप्रमाणे इर्ष्या, चुरस नव्हती. त्यामुळे याठीकाणी किरकोळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
निवडणुकीत विजयी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेले मतदान असे :
व्यक्ती सभासद प्रतिनिधी : अमरसिंह माने (10101), सर्जेराव देसाई (10026), अजित मोहिते (10025), अॅङ दत्तात्रय राणे (9973), जी. डी. पाटील (9944), आनंदा बनकर (9913), दत्ताजीराव वारके (9735).
संस्था सभासद प्रतिनिधी : आप्पासो चौगुले (1281), सुभाष जामदार (1279), प्रविणसिंह पाटील (1277), विजयसिंह पाटील (1277), बाबासाहेब शिंदे (1277), प्रधान पाटील (1267), जयकुमार मुनोळी (1266).
महिला राखीव प्रतिनिधी : अपर्ण पाटील (11216), रोहिणी पाटील (11048). अनुसुचित जाती-जमाती : परशुराम कांबळे (11383).