UPSC Exam 2025 : शाब्बास रे पठ्ठ्या! सरवडेचा श्रेयस मोरे बनला सैन्य दलातील लेफ्टनंट
पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याचे यूपीएससी परीक्षेतील यश अधोरेखित
By : विजय पाटील
सरवडे : येथील श्रेयस श्रीकांत मोरे या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या सीडीएस परीक्षेत वर्ग एक दर्जाच्या लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या यशामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याचे यूपीएससी परीक्षेतील यश अधोरेखित झाले आहे.
या यशामुळे सरवडे गावासह कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे देशातील तब्बल पाच लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामध्ये श्रेयस २१० वा क्रमांक मिळवला आहे. भारतातील सर्वात खडतर समजल्या जाणाऱ्या या परीक्षेतील यशामुळे श्रेयसची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
श्रेयसचे प्राथमिक शिक्षण कुमार विद्यामंदिर, सरवडे येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सातारा सैनिक स्कूल सातारा येथे झाले. त्यानंतर पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, पुणे येथून अभियांत्रिकीमधून पदवी प्राप्त करत त्याने या परीक्षेची तयारी सुरू केली. आणि अल्पावधीतच घवघवीत यश प्राप्त केले.
वडील श्रीकांत दत्तात्रय मोरे व आई सुवर्णा मोरे यांच्या पोटी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या श्रेयसने अतिशय खडतर परिस्थितीतून आपल्या यशाचा मार्ग निश्चित केला. त्याची झालेली निवड नवीन पिढीला प्रेरणा देणारी आहे.
संपूर्ण देशात २१० व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्याने एक आदर्श निर्माण केला आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याचा मोठा भाऊ रोहितने अलीकडेच मुंबई पोलीस कॉन्स्टेबल, मुंबई पोलीस चालक, कोल्हापूर एस आर पी एफ व ग्रामसेवक या तब्बल चार परीक्षेत यश मिळवले आहे.
श्रेयसच्या या निवडीमुळे सरवडे परिसरातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. गोकुळ दूध संघ व बिद्रीचे संचालक आर के मोरे, सरवडेचे लोकनियुक्त सरपंच रणधीर मोरे,प्रा. अतुल कुंभार, प्रा.अनिकेत हुल्ले, उद्योजक पंकज पाटील, संतोष वाइंगडे, शंकर कोपार्डेकर, विशाल पाटील, शहाजी पाटील आदींनी त्याचे अभिनंदन केले.
युवा पिढीला संदेश
"तरुण-तरुणींनी आपल्या आई-वडील व परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून सातत्य जिद्द व कष्टाच्या जोरावर यश मिळवता येते हे नेहमी लक्षात ठेवावे. प्रत्येक अडचणीवर उपाय असतोच. त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्टा करावी यश आपलेच आहे. इतर अधिकाऱ्यांचा आदर्श माझ्या समोर होता. लहानपणापासून ध्येय ठेवून कार्यरत राहिलो. अनेक वेळा अपयश आले, परंतु जिद्द सोडली नाही. त्यामुळे यश मिळवता आले."
- श्रेयस मोरे