For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेंढपाळांची चाऱ्यासाठी रानोमाळ भटकंती...!

11:10 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
मेंढपाळांची चाऱ्यासाठी रानोमाळ भटकंती
Advertisement

चारा संकट तीव्र, पाला-पाचोळ्यावर गुजराण, प्रशासन सुस्त : चाऱ्यासाठी दररोज 20 ते 40 कि. मी. मेंढपाळांची पायपीट, शेळ्यामेंढ्यांची घालमेल

Advertisement

बेळगाव : भीषण दुष्काळामुळे सर्वत्र चारा, पाण्याची कमतरता भासू लागली आहे. परिणामी मेंढपाळांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. तर अशा परिस्थितीत काही मेंढपाळांनी स्थलांतर केले आहे. तर काही ठिकाणी चाऱ्याविना मेंढपाळांना झाडांचा पाला घालून गुजरान करावी लागत आहे. मेंढपाळांसाठी चारा, पाणी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होवू लागली आहे. पशुसंगोपन खात्याने जिल्ह्यात पुढील 20 आठवडे पुरेल इतका चारासाठा शिल्लक असल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात चाऱ्यासाठी मेंढपाळांना भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये 13 लाख गायी, म्हैस, बैल तर 14 लाख शेळ्यामेंढ्या आहेत. यापैकी जनावरांसाठी गोकाक, अथणी तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र शेळ्या, मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे.

नदी-नाल्यांची पाणी पातळी झपाट्याने खाली

Advertisement

गतवर्षी पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाली होती. त्यामुळे यंदा नदी, नाले, तलाव, जलाशयांच्या पाणी पातळी झपाट्याने खाली गेली आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याची टंचाई भासू लागली आहे. विशेषत: अथणी, सौंदत्ती, बैलहोंगल, रायबाग आदी तालुक्यांमध्ये चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मेंढपाळांना चारा, पाण्याच्या शोधात भटकंती करण्याची वेळ आली आहे. मात्र सर्वत्रच चारा, पाणी मिळेनासा होत असल्याने शेळ्या, मेंढ्यांच्या शरीरावर परिणाम होऊ लागला आहे.

चाऱ्यासाठी रोज पायपीट

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत उन्हाचे चटके सहन करत मेंढपाळांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. चारा पाण्यासाठी दररोज 20 ते 40 कि.मी. पायपीट करावी लागत आहे. मात्र यंदा नदी आणि तलावांच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. त्यामुळे पायपीट करुनही जवळ पाणी मिळत नसल्याने काहीवेळा शेळ्या, मेंढ्या चारा, पाण्याविना राहू लागले आहेत, अशी खंतही मेंढपाळांनी व्यक्त केली. सर्वत्र निवडणुकीचा फिव्हर पहावयास मिळत आहे. त्यामुळे आमच्याकडे कोणी लक्ष देणार का? अशी आर्त हाकही मेंढपाळांनी दिली आहे.

जिल्ह्यात मेंढपाळांची संख्या मोठी

जिल्ह्यात काही ठिकाणी वळिवाचा पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अद्याप वळिवाचा पाऊस बरसला नाही. त्यामुळे नवीन चाऱ्याची उगवणही झाली नाही. त्यामुळे मेंढपाळांना चारा मिळणे अशक्य होवू लागले आहे. जिल्ह्यात मेंढपाळाची संख्याही मोठी आहे. मात्र त्यांच्यासाठी चारा, पाण्याची व्यवस्था नसल्याने मेंढपाळांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. चारा मिळत नसल्याने झाडाचा पाला आणि रस्त्यावर पडलेला सुका चारा घालून दिवस ढकलण्याची वेळ आली आहे. वळीव पाऊस लांबणीवर पडल्यास मेंढपाळांसमोर चारा, पाण्याचे संकट अधिक तीव्र होणार आहे. वाढत्या उन्हात मेंढपाळ आणि शेळ्यामेंढ्यांची पाण्यासाठी घालमेल सुरू आहे.

चारा छावण्यांतून चारा घेऊन जावे

जिल्ह्यात पुढील 20 आठवडे पुरेल इतका चारासाठा शिल्लक आहे. तसेच ज्या ठिकाणी चाऱ्याची कमतरता भासत आहे. त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यावर भर दिला जात आहे. मेंढपाळांनी पाणी असलेल्या ठिकाणी स्थलातंरीत व्हावे. शिवाय चारा छावण्या सुरू केलेल्या ठिकाणांहून चारा घेऊन जावे.

- राजीव कुलेर (सहसंचालन पशुसंगोपन खाते)

प्रशासनाकडून कोणतीच दखल नाही

चारापाणी मिळत नसल्याने कोसोमैल भटकंती करावी लागत आहे. काहीवेळा शेळ्यामेंढ्यांना झाडाचा पाला घालून दिवस ढकलावे लागत आहेत. प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे मेंढरांचा कळप घेवून चारापाण्यासाठी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फिरण्याची वेळ आली आहे.

- वैजु नरोटी-मेंढपाळ

Advertisement
Tags :

.