Birudev Dhone: मेंढर राखायचा, शिवारातच अभ्यास करायचा, यमगेचा बिरदेव बनला IPS अधिकारी!
आयपीएस म्हणजे काय, हे माहीत नसलेल्या आई-बाबांना मी पोलिसात जाणार, एवढंच सोपं करून सांगायचा
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : बेळगाव जवळच्या एका खेड्यात धनगरांच्या मेंढरांचा कळप चारण्यासाठी एका शिवारात आहे. त्या मेंढरांची लोकर कापणीही सुरू आहे. एक तरुण त्याच्या मामासोबत हा कळप सांभाळत आहे आणि अधून-मधून एखादा मोटरसायकलीवरून येतो. एखादा गाडीतून येतो आणि त्या मेंढराच्या कळपात लोकर कापत बसलेल्या तरुणाच्या गळ्यात हार घालून तोंडात पेढा-बर्फी चारतो. भंडारा लावून लावून तर या तरुणाचा चेहरा पिवळाधम्मक झाला आहे. त्या वर्णनावरून सर्वांनाच असे वाटेल की हा गळ्यात हार, कपाळाला भंडारा लावलेल्या तरुणाचा हा वाढदिवस असेल. पण वास्तव खूप वेगळे आहे आणि क्वचितच दिसणारे आहे.
कारण मेंढरांच्या कळपात बनियनवर असलेला हातात काठी घेतलेला हा तरुण म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आय.पी.एस. झालेला बिरदेव ढोणे आहे. कालच त्याच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि या परीक्षेत पास होणे म्हणजे सर्वोच्च आनंदाचा क्षण. जरूर त्याचा आनंद बिरदेवलाही आहे. पण गेले चार दिवस मेंढरांचा कळप घेऊन तो बेळगाव परिसरात आहे. ज्याला, ज्याला हे कळाले त्यांच्या शुभेच्छा तो मोबाईलवर स्वीकारत आहे. त्याचे अभिनंदन करायला नातेवाईक, मित्र येत आहेत. मेंढरांचा तळ टाकून बसलेल्या बिरदेवचे तेथे अभिनंदन करत आहेत.
आपण आयपीएस झालो, याचा बिरदेवलाही आनंद आहे. पण म्हणून लगेच मेंढराचा कळप सोडून परत गावाकडे जायचे, हे त्याला अमान्य आहे. त्याने आयपीएस होण्यासाठी खूप अभ्यास केला. ज्यावेळी कळप घेऊन जायचा, त्यावेळी शिवारात बसूनही तो अभ्यास करायचा. निकाल लागला. त्यावेळी तो कळपासोबत होता. कळपातील ही मेंढरे त्याच्या मामाची आहेत. त्यामुळे तो कळप तर सांभाळत आहेच, पण मेंढराची लोकर तो कापत आहे. कागल तालुक्यातील यमगे हे बिरदेवाचे गाव. बिरदेवचे वडील सिद्धाप्पा आणि आई बाळाबाई.
या कुटुंबाचा व्यवसाय मेंढरे पाळण्याचा. मेंढरांना चारण्यासाठी गावोगाव भटकत राहण्याचा. बिरदेवचा त्यात कायम सहभाग. या परंपरागत व्यवसायाचा त्याला खूप अभिमान आहे. त्यामुळे तो सवड मिळाली की मेंढरांच्या कळपासोबत राहायचा. त्याच्या आई-वडिलांना आयएएस ,आयपीएस म्हणजे काय, माहिती नाही. आपला बिरदेव काहीतरी शिकतो आहे, एवढेच त्यांना माहिती होते. त्यामुळे ते बिरदेवला अभ्यास कर, मेंढरं राखायला येऊ नकोस, असे सांगायचे. त्याचा मामाही त्याचे कौतुक करत राहायचा. पण, बिरदेव घरातल्या पारंपरिक व्यवसायात मनापासून रमत राहिला.
आयपीएस म्हणजे काय, हे माहीत नसलेल्या आई-बाबांना मी पोलिसात जाणार, एवढंच सोपं करून सांगायचा. गेले तीन-चार दिवस तो मामाच्या मेंढराच्या कळपासोबत बेळगाव परिसरात आहे आणि त्याच दरम्यान ‘यूपीएससी’चा निकाल जाहीर झाला आहे. बिरदेवच्या दृष्टीने हा अतिशय अभिमानाचा आणि मोठ्या कामगिरीचा क्षण आहे. त्याचा आनंद त्याला आहे. पण मेंढराच्या कळपासोबत तो सध्या चारणीवर म्हणजे फिरतीवर आहे. मेंढराची चारणी म्हणजे हवामानानुसार मेंढरांचा कळप विविध प्रदेशात फिरवत राहायचे. सध्या याच पारंपरिक कामात बिरदेव आहे.
कितीही यश मिळालं तरी जमिनीवर...
पुढची ऑर्डर येईपर्यंत तरी हे पिढ्यान्पिढ्याचे काम करत राहायचे, हेच त्याच्या मनात आहे. हे काम मी करतोय, ते फार मोठे आणि काहीतरी जगावेगळे आहे, असला काही विचारच बिरदेवच्या मनात नाही. त्यामुळे आजही बिरदेव मेंढरासोबतच होता. काखेत कोकरू घेऊन त्याला कुरवाळत होता. तिथे येऊन अभिनंदन करणाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत होता. जणू काही कितीही यश मिळालं तरी जमिनीवर कसे राहायचे, हेच बिरदेव त्या कोकराला काखेत घेऊन दाखवत होता.