शेंडा पार्कच्या अस्तित्वाचीच धग-धग !
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
शेंडा म्हणजे गावाचे शेवटचे टोक किंवा निवडुंगाचा मोठा फड, अशी कोल्हापुरातली ओळख. मी गावाच्या शेवटच्या टोकाला राहतो, असे न म्हणता शेंड्याला राहतो, असेही म्हणायची पद्धत. तर कोल्हापूरचे शेवटचे टोक म्हणजे शेंडा पार्क. जिकडे नजर फिरवावी तिकडे उघडा माळ. सतत घोंगावणारे वारे. आणि एवढ्या विस्तीर्ण अशा माळावर दगडी कमान आणि कौलारू खोल्यांची रांग असलेली फक्त एक आणि एकच इमारत. तेथे कुष्ठरूग्णांवर उपचार आणि त्यांच्या राहण्यासाठी केलेली ती खास सोय. संस्थान काळापासून कोल्हापुरात कुष्ठरूग्णांवर उपचार करण्यासाठी कशी विशेष सोय केली होती, याचे हे वास्तुरूपी उदाहरण आहे.
कुष्ठरोग्यासाठी दवाखाना म्हणून या परिसराची ओळख. पण त्याआधी ही जागा म्हणजे संस्थानकालीन घोड्याच्या पागेची जागा होती. तेथे घोड्यांना पाण्याची सोय आणि घोड्यांना रपेट देण्यासाठी गोलाकार गवती कुरण होते. पण कोल्हापूर संस्थानचे कार्यच असे वेगळे, की त्याकाळी कुष्ठरूग्णाला घरातूनही हाकलून दिले जायचे. वाऱ्यावर सोडले जायचे. कुष्ठरूग्ण रस्त्याकडेला तडफडत कसा-बसा जगायचा. पण कोल्हापूर संस्थांनने त्या कुष्ठरूग्णांसाठी पहिल्यांदा उचगाव येथे कुष्ठधामाची सोय केली.
तेथे आसपास वस्ती वाढू लागल्याने 29 ऑक्टोबर 1910 च्या हुजूर ठरावाने कुष्ठरूग्णांसाठी अनुस्कुरा येथे सोय करण्यात आली, पण ते ठिकाण कोल्हापूरपासून अतिशय लांब पडू लागले. म्हणून कोल्हापुरात शेंडा पार्कच्या जागेत 21 जून 1944 साली कुष्ठ धाम केंद्र सुरू करण्यात आले. कुष्ठरूग्ण कोठेही रस्त्यावर फिरताना आढळला तर त्याला या कुष्ठधामात आणून सोडण्याचा सर्व मामलेदारांना हुकूम झाला.
या जागेत बागेच्या ठिकाणी महिला कुष्ठरूग्णांसाठी व त्यामागील मोठ्या शेडमध्ये पुरुष कुष्ठरुग्णांची सोय करण्यात आली. तत्कालीन सिव्हिल सर्जन सीमन्स यांनी त्यावर देखरेख ठेवली. पाण्यासाठी कृत्रिम तलाव बांधण्यात आला, बंधारा बांधण्यात आला. शेतीच्या कामात कुष्ठरूग्णांना गुंतवण्यात आले. गायी-म्हशी पाळण्यात आल्या. शेतीच्या धान्यांवर कुष्ठरूग्णांचा उदरनिर्वाह सुरू झाला. त्याकाळी डेपसोन हे औषध कुष्ठरूग्णांना द्यावे लागे. दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर आजार बरा होत असे. पण रोगाचे शरीरावर विशेषत: हातापायाच्या बोटावर झालेले परिणाम तसेच राहत होते आणि कुष्ठरूग्णांच्या जवळ जाण्यासाठी लोक घाबरत होते.
त्या काळात बहिरू बाळू कात्रे या कर्मचाऱ्याची कुष्ठरूग्णांवर देखरेख करण्याची जबाबदारी होती. त्यांची पत्नी सर्वांचे भोजन बनवण्याचे काम करायची. कमानी जवळच्या मारुती मंदिरात दर शनिवारी सामूहिक आरती केली जायची. कुष्ठरूग्णांसोबत हे कात्रे मामा एकमेव राहत होते. या परिसरात कोणीही जात नसे. गेलेच तर नाकाला रुमाल किंवा चांगले मोठे फडके तोंडाला बांधून लोक ये-जा करत होते.
कुष्ठधामाच्या जागेपैकी बहुतांशी एकर जागा कृषी महाविद्यालयास देण्यात आली. अन्य जागेवर शासकीय सोयीसाठी इतर बांधकामे सुरू झाली. जागेचा नेमका हिशोब करणेही अलीकडच्या काळात अवघड झाले. एक काळ फक्त निरव आणि निरव शांतताच असलेल्या या परिसरात वर्दळ सुरू झाली. कुष्ठरूग्णांची संख्या कमी झाली आणि या जागेवर अनेकांची नजर पडण्यास सुरूवात झाली. जागेवर नजर असलेले आता अनेक जण आहेत. त्यामुळे ही जागा कोणालाच मिळवता आलेली नाही. आता सोमवारी पहाटे या कुष्ठ धामाच्या जागेत आग लागली. आग मोठी होती. दगडी कमान वगळता इतर कागदपत्रे, लाकडी बांधकाम भस्मसात झाले. आग लागली की, त्यामागे अन्य काही घडले, याचीही कुजबुज सुरू झाली. पण या आगीच्या निमित्ताने शेंडा पार्कच्या अस्तित्वालाच त्याची झळ बसते की काय, अशी भीती मात्र आणखी गडद होऊन गेली.
- बोकडाची समाधी
या परिसरात पाण्यासाठी बंधारा बांधलेला आहे. तेथे म्हसोबाचे मंदिर आहे. त्यासमोर एका बोकडाची समाधी आहे. कुष्ठरोग बरा व्हावा म्हणून देवाला कोणातरी कुष्ठरूग्णाच्या नावाने सोडलेला हा बोकड होता. तो या गवती परिसरात चांगलाच पोसला गेला होता. या बोकडाच्या मृत्यूनंतर त्याची समाधी येथे बांधलेली आहे. दरवर्षी या परिसरात नाईकबाची यात्रा भरते. त्यानिमित्ताने बैलगाडीच्या शर्यती होतात.