शेखर निकम मंत्री होवोत : भाऊ कदम
प्रतिनिधी देवरुख
चिपळूण-संगमेश्वरचे विद्यमान आमदार शेखर निकम हे जात, पात, धर्म न पाहता निःस्वार्थी मनाने काम करत आहेत. मतदार संघात विकास कामांची गंगा आणली आहे. निकम यांना मतदान करून भरघोस मतांनी विजयी करूया. शेखर निकम विजयी होण्याबरोबरच मंत्री झालेले नक्की आवडेल, असे प्रतिपादन सिने अभिनेते भाऊ कदम यांनी शनिवारी केले.
शेखर निकम यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेते भाऊ कदम यांनी शनिवारी देवरूख नगरीत रोड शो केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून फटाक्यांच्या आतिषबाजीत रोड शोला प्रारंभ झाला. बाजारपेठ-एसटी स्टॅन्ड- माणिक चौक-ते सोळजाई मंदिर असा रोड शो करण्यात आला. रोड शोमध्ये चाहत्यांनी भाऊ कदम यांच्यासमवेत सेल्फी व स्वाक्षरी घेतली. दरम्यान तत्पूर्वी राष्ट्रवादी कार्यालयात भाऊ कदम यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाऊ कदम बोलत होते. ते पुढे म्हणाले, निकम यांनी जनतेच्या गरजा हेरून त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामुळे जनतेचा कौल निकम यांच्या बाजूने असेल असा विश्वास व्यक्त केला. अजितदादा पवार मुख्यमंत्री तर शेखर निकम मंत्री होवोत, यासाठी भाऊ कदम यांनी शुभेच्छा दिल्या.