For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेख हसीना यांचा कार्यक्रम खासगी संस्थेकडून!

06:48 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेख हसीना यांचा कार्यक्रम खासगी संस्थेकडून
Advertisement

बांगलादेशच्या आक्षेपावर भारत सरकारची स्पष्टोक्ती

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

Advertisement

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बुधवारच्या कार्यक्रमावर जगभराची नजर लागून राहिली आहे. बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या हिंसक निदर्शनांदरम्यान सत्ता सोडावी लागल्याच्या दोन वर्षांनी हसीना व्हर्च्युअल पद्धतीने एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन दिल्लीत ‘फॉरेन कॉरेस्पोंडेट्स क्लब ऑफ साउथ एशिया’कडून केले जात आहे, या कार्यक्रमाबद्दल बांगलादेशने व्यक्त केलेला आक्षेप भारत सरकारने मंगळवारी फेटाळला आहे.

माजी पंतप्रधान शेख हसीना किंवा अवामी लीगशी निगडित कुठल्याही व्यक्तीला भारतीय भूमीचा वापर राजकारण किंवा बांगलादेशात अस्थिरता निर्माण करणाऱ्या घडामोडींसाठी करू दिला जाऊ नये असे बांगलादेशने भारताला सांगितले होते. आता याप्रकरणी भारताच्या विदेश मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले आहे.

शेख हसीना यांच्याशी संबंधित या कार्यक्रमाचे आयोजन एका खासगी माध्यम संस्थेकडून केले जात आहे. भारत सरकारची यात कुठल्याही प्रकारची भूमिका नाही आणि सरकार या कार्यक्रमात मांडले जाणाऱ्या कुठल्याही विचारांचे समर्थन करत नसल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी म्हटले आहे.

शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी

बांगलादेशने पुन्हा एकदा भारताकडे शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. हसीना यांनी मायदेशात परतून कायद्याला सामोरे जावे आणि भारतात वास्तव्य करताना कुठल्याही प्रकारचे राजकीय वक्तव्य करू नये. बांगलादेशने भारताला यासंबंधी पत्र लिहिली आहे तसेच भारतीय उच्चायुक्तांसमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे. हसीना परतल्यास त्यांना अटक करण्यात येईल आणि त्यांना स्वत:च्या सर्व कायदेशीर अधिकारांचा वापर करण्याची संधी मिळेल, ज्यानंतर न्यायालय पुढील निर्णय घेईल असे बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांचे सल्लागार जाहेद उर रहमान यांनी म्हटले आहे.

कार्यक्रम कुठे आयोजित होणार?

हिंसक आंदोलनांतर बांगलादेश सोडावा लागलेल्या शेख हसीना या बुधवारी दिल्लीतील फॉरेन कॉरेस्पोंडेंट्स क्लब ऑफ साउथ एशियामध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करतील. या कार्यक्रमात त्या प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत. हा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरू होत 7.30 वाजेपर्यंत चालणार आहे.

कार्यक्रमात कुणाचा सहभाग?

-हसीना यांचे पुत्र अन् आयसीटी सल्लागार साजिद वाजेद जॉय

-बांगलादेशचे माजी शिक्षणमंत्री मोहिबुल हसन चौधरी नौफेल

-माजी राजनयिक अन् सुरक्षा विश्लेषक अमीनुल हक पोलाश

-बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू अन् माजी खासदार शाकिब अल हसन

-राजनयिक अन् दहशतवादविरोधी विश्लेषक अबू ओबैदा अरिन

-बांगलादेश ह्यूमन राइट्स वॉचचे महासचिव मोहम्मद अली सिद्दीकी

-बांगलादेश ह्यूमन राइट्स वॉच युएसएचे संचालक शाह मोहम्मद बख्तियार

Advertisement
Tags :

.