शेख हसीनांची हकालपट्टी पूर्वनियोजित !
मोहम्मद युनुस यांच्याकडून कटाची कबुली, सूत्रधाराचे नावही केले उघड
वृत्तसंस्था/ढाका
बांगला देशच्या माजी नेत्या शेख हसीना यांची हकालपट्टी पूर्वनियोजित असून तसे कारस्थान आधीच रचण्यात आले होते, अशी कबुली त्या देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांनी दिली आहे. ते सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तेथे बिल क्लिंटन ग्लोबल इनिशिएटीव्ह इव्हेंट या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी ही खळबळजनक कबुली दिली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी या कटाच्या मुख्य सूत्रधाराचे नावही घोषित केले आहे.
महफूज अब्दुल्ला नामक नेत्याने हे कारस्थान रचले होते. त्याच्या मागे कोण होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र हा उठाव यशस्वी झाला असा गौप्यस्फोट त्यांनी केला. अब्दुल्ला याच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी अचानक उठाव केला. त्यामुळे परिस्थिती शेख हसीना यांच्या हाती राहिली नाही. त्यांना देश सोडून पळून जावे लागले. या कटाची आधी कोणालाही कल्पना येऊ नये, याची दक्षता घेण्यात आली होती, असेही मोहम्मद युनुस यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले आहे.
हसीना यांचा आरोप
शेख हसीना सध्या भारतात आहेत. बांगला देश सोडून भारतात आल्यानंतर त्यांनी अमेरिकेवर आरोप केले होते. अमेरिकेच्या मागण्या आपण मान्य केल्या नाहीत, म्हणून आपल्याला सत्ताभ्रष्ट करण्यात आले. हे अमेरिकेचे कारस्थान आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले होते. मात्र, हे कारस्थान कोणाचे हे अद्यापही स्पष्ट झाले नव्हते. मोहम्मद युनुस यांनीही यासंबंधी सविस्तर माहिती दिलेली नाही.
अदृष्य हाताचे साहाय्य
कारस्थान जरी एका व्यक्तीने रचले असले तरी, तिला रसद पुरविणारे हात अद्यापही अदृष्यच आहेत. तथापि, मोहम्मद युनुस आणि अमेरिका यांचे संबंध 80 च्या दशकातासून मैत्रीचे आहेत विशेषत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी त्यांचे अनेकदा कौतुक केले आहे. युनुस यांनी बांगला देशात जी आर्थिक प्रगती करुन दाखविली, तशी जगातील मोजक्याच नेत्यांनी केली आहे, अशा शब्दांमध्ये क्लिंटन यांनी युनुस यांची प्रशंसा काही वर्षांपूर्वी केली होती.
अमेरिकेकडून साहाय्याचे आश्वासन
बांगला देशात सत्तांतर झाल्यानंतर प्रथम अमेरिकेनेच त्या देशाला आर्थिक साहाय्याचा हात देऊ केला होता. अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी बांगला देशला आवश्यकता असल्यास आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले होते. भविष्य काळात हे दोन देश एकमेकांशी कसे वागतात, यावरुन बऱ्याच बाबी उघड होणार आहेत, असे प्रतिपादन अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांनी केले आहे.
पुढे काय होणार?
बांगला देशात आता सर्वपक्षीय अंतरिम सरकार आहे. मोहम्मद युनुस हे या सरकारचे प्रमुख सल्लागार आहेत. एक प्रकारे या देशाची सत्ता त्यांच्याच हाती आहे, असे मानले जाते. त्यांनी बांगला देशात लवकरात लवकर सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. तथापि, सध्या जी स्थिती आहे, तिचा लाभ त्या देशातील धर्मांध शक्तींकडून उठविला जाण्याची शक्यताही दाट आहे. शेख हसीना यांच्या विरोधात जेव्हा आंदोलन होत होते, तेव्हा आणि त्यानंतरही बांगला देशमधील हिंदूंवर मोठे अत्याचार झाले होते. सध्या ते थांबले असून परिस्थिती शांत असल्याचे जाणवत आहे. तथापि, अंतरिम सरकारने योग्य नियंत्रण ठेवले नाही, तर या शक्तीच प्रबळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढच्या काळात या देशाची वाटचाल प्रगतीच्या मार्गाने होते की धर्मांधतेच्या मार्गाने होते, याकडे जगाचे लक्ष असेल, असे तज्ञांचे मत आहे. भारतालाही त्याच्या सुरक्षेसाठी या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवावे लागणार आहे.