शेख हसीना यांच्या भाचीने गमाविले मंत्रिपद
ब्रिटनमध्ये ट्यूलिप सिद्दीक यांचा राजीनामा
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या तक्रारीनंतर शेख हसीना यांच्या भाची ट्यूलिप सिद्दीक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. युनूस यांनी ब्रिटनच्या मंत्री ट्यूलिप सिद्दीक तसेच त्यांच्या परिवाराच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती. ट्यूलिप या 9 जुलैपासून ब्रिटनच्या मजूर सरकारमध्ये आर्थिक सचिव आणि शहर मंत्री म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्या 2010 ते 2014 पर्यंत रीजेंट पार्कसाठी कॅमडेन लंडन बरो कौन्सिलर होत्या.
42 वर्षीय ट्यूलिप यांनी स्वत:वरील आरोप फेटाळले होते. ट्यूलिप सिद्दीक यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी म्हटले होते. तर दोन महिन्यात दुसऱ्या मंत्र्याने राजीनामा दिल्याने पंतप्रधान स्टारमर यांना मोठा झटका बसला आहे. अलिकडच्या सर्वेक्षणांमध्ये स्टारमर यांची लोकप्रियता खालावल्याचे दिसून आले आहे.
वित्तीय प्रकरणांच्या चौकशीत मंत्रिपदाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले नसल्याचे आढळून आले आहे. परंतु माझे पद सरकारच्या कामात अडथळे निर्माण करणारे आहे. याचमुळे मी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सिद्दीक यांनी एका वक्तव्याद्वारे नमूद केले आहे. तर स्टारमर यांनी पेन्शन मंत्री एम्मा रेनॉल्डस यांना सिद्दीक यांच्याकडील विभागांची जबाबदारी सोपविली आहे.
मोहम्मद युनूस यांचे आरोप
सिद्दीक आणि त्यांच्या परिवाराला शेख हसीना यांच्या सहकाऱ्यांकडून भेट म्हणून देण्यात आलेल्या संपत्तींचा उल्लेख युनूस यांनी केला होता. सिद्दीक यांनी या संपत्ती बांगलादेशला परत कराव्यात. हा स्पष्टपणे दरोडा आहे. शेख हसीना सरकारने घोटाळे करत मनी लॉन्ड्रिंग केले असून याचा देशावर दीर्घकालीन प्रभाव पडल्याचा आरोप युनूस यांनी केला होता.
पनामा पेपर्सशी जोडलेले नाव
सिद्दीक यांनी अनेक वर्षांपर्यंत हॅम्पस्टेडच्या एका निवासस्थानात वास्तव्य केले होते. ही संपत्ती पनामा पेपर्समध्ये नाव असलेली एक ऑफशोर (विदेशात मालकी असलेली कंपनी) कंपनीने खरेदी केली होती आणि याचा संबंध दोन बांगलादेशी उद्योजकांशी होता.